पाथरी : सतत पाऊस पडत राहिल्याने जमिनीमध्ये पाणी साचले. यामुळे खेर्डा येथील एका शेतकऱ्याची विहीर कोसळल्याचा प्रकार ३ सप्टेंबर रोजी सकाळी घडला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाथरी तालुक्यात गत आठवड्यात तीन दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी तर आलेच त्याचबरोबर गोदावरी नदीलाही पाणी आले. संततधार पावसामुळे शेतात पाण्याचे डोह साचले. जमिनीला ओलावा फुटला. तालुक्यातील खेर्डा येथील शेतकरी दगडू आमले यांच्या शेत गट नं. १०१ मध्ये ८ फूट खोदलेली जुनी विहीर आहे. या विहिरीचे विटांचे बांधकाम करण्यात आले होते. विहिरीत पाणीही भरपूर होते. पावसामुळे विहिरीच्या बाजूचा भाग खचून ३ सप्टेंबर रोजी सकाळी विटाने बांधकाम केलेली विहीर कोसळली. सदरील शेतकरी शेतामध्ये सकाळी गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. (वार्ताहर)
विहीर कोसळली
By admin | Updated: September 4, 2014 00:19 IST