भूम : पारधी समाजबांधवांनी समाजाच्या उन्नतीसाठी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच समाजातील महिलांनीही बचत गट तयार करून कुटुंबाची पर्यायाने समाजाची आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. तालुक्यातील गोलेगाव (पारधी वस्ती) येथे गुरूवारी सुवर्ण जयंती अभियानांतर्गत दाखले वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आ. राहुल मोटे, उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार अरविंद बोळंगे, जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे, गटविकास अधिकारी बी. टी. उगलमुगले, तालुका कृषी अधिकारी एम. एस. पोले, वैद्यकीय अधीक्षक विजयकुमार सूळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. नारनवरे म्हणाले, पारधी समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तालुक्यातील दहा ते पंधरा गावांची निवड प्रशासनाने केली असून, या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमास माजी सरपंच कल्याण शिंदे, गोलेगावचे उपसरपंच आयुब शेख, नगरसेवक गणेश शेंडगे, रूपेश शेंडगे, यांच्यासह तहसील कार्यालय, पंचायत समिती, वन विभाग, ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसह तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक व पारधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)तपासणी शिबीरयाच कार्यक्रमात ग्रामीण रूग्णालयाच्यावतीने सकाळी नऊ ते दहा या वेळेत पारधी समाजासाठी सर्व रोग निदान तपासणी शिबीरही घेण्यात आले. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे वैद्यकीय अधीक्षक विजयकुमार सूळ यांनी सांगितले. रेशन कार्डांचेही वाटपया कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते ४२ जणांना जातीचे तर २३ जणांना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय ६२ कुटुंबांना रेशनकार्ड तर ५ जणांना आरोग्य कार्डांचे वाटप करण्यात आले. पारधी वस्तीवरील शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी २५ बेंच, तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने पाच शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे, पंचायत समितीकडून शेतीसाठी आठ स्प्रे पंपाचे वाटप आणि जय हनुमान ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी पन्नास रोपांची लागवडही करण्यात आली.
गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी
By admin | Updated: July 11, 2014 00:59 IST