राम तत्तापूरे ,अहमदपूरमहाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या हवामानावर आधारीत पीक विमा योजनेत तालुक्यातील २३ हजार ६६६ शेतकऱ्यांनी पीक विमा जिल्हा बँकेकडे भरला आहे़ या पीक विम्यापोटी मिळणारी रक्कम ४५ दिवसामध्ये जाहीर होणार असल्याचे शासनाच्या निर्णयात दिले आहे़ तरीही या पीक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत शासनाकडून जाहीर करण्यात आली नाही़ त्यामुळे हवामानावर आधारीत पीक विम्यापोटी मिळणारी रक्कम जाहीर होणार तरी कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांतून चर्चेला येत आहे़ हवामानावर पीक विमा ही योजना महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यात लागू करण्यात आली़ यामध्ये जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला़ सदरील योजना खरीप हंगाम २०१४ मध्ये पथदर्शी स्वरूपात राबविण्यात आली़ यामध्ये प्रामुख्याने कमी पाऊस, पावसातील खंड या विविध परिस्थितीमध्ये शासनाच्या वतीने विमा संरक्षण देण्याचे नियोजन चालू वर्षात करण्यात आले आहे़ या योजनेमध्ये खरीप ज्वारी, सोयाबीन, उडीद आणि मूग या चार पिकांसाठी पीक विमा भरण्याचे नियोजन करण्यात आले होते़ यामध्ये तालुक्यातील १७ हजार ८५९ कर्जदार व ५८०७ बिगर कर्जदार अशा एकूण २३ हजार ६६६ शेतकऱ्यांनी १ कोटी ५२ लाख रूपयांचा हवामानावर आधारीत पीक विमा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत बजाज अलाईन्स जनरल इन्सुरन्स कंपनीकडे भरला़ या योजनेअंतर्गत विमा कंपनीकडून नुकसानभरपाई निश्चित करण्याचा कालावधी ४५ दिवसांचा दिला असतानाही अद्याप हवामानावर आधारीत पीक विम्याची रक्कम जाहीर करण्यात आली नाही़ त्यामुळे अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या मिळणाऱ्या विमा हप्त्याकडे लागले आहे़
मदतीची प्रतीक्षा
By admin | Updated: September 3, 2014 01:10 IST