वाशी : अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर मागील तीन-चार दिवसांमध्ये जिल्हाभरात पेरणीयोग्य पाऊस पडला आहे. उडीद आणि मूग या पिकांच्या लागवडीचा कालावधी निघून गेल्याने बहुतांश शेतकरी सोयाबीन आणि कापसाच्या लागवडीवर भर देताना दिसत आहेत. मात्र, वाशी तालुक्यामध्ये ‘अजीत-१५५’ या वाणाच्या कापूस बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी जादा पैसे मोजून बीड जिल्ह्यातून बियाणे आणत असल्याचे सूत्रांनी सांगितले.वाशी तालुक्यामध्ये मागील काही वर्षांपासून कापसाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होऊ लागली आहे. परिणामी आता या तालुक्याला ‘कॉटन बेल्ट’ म्हणून ओळखले जात आहे. यंदाही या भागातील शेतकरी कापूस लागवडीवर भर देताना दिसून येत आहेत. पाऊस पडत नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यानंतर बियाणे घेऊ, असे ठरविले होते. मागील तीन-चार दिवसांमध्ये जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या लगबगीने पेरणीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे कृषी दुकानांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. परंतु, ऐण पेरणीच्या तोंडावर कापसाच्या ‘अजित-१५५’ या वाणाच्या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यासाठी १ हजार २०० पाकिटे मंजूर होती. हा सर्व स्टॉक विकला गेल्याचे दुकानदार सांगतात. वाशी तालुक्यामध्ये हे बियाणे उपलब्ध नसल्याने बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावातील शेतकरी बीड येथून चढ्या दराने बियाणे खरेदी करताना दिसून येत आहेत. एका बॅगसाठी किमान १२०० ते १३०० रूपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे तेथील विक्रेतेही ओळख असणाऱ्यांनाच बियाणे देत असल्याचेही काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.कळंब/ईट : खत, बी-बियाणे मुबलक असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असला तरी प्रत्यक्ष विगळेच चित्र निर्माण झाले आहे. आवश्यक असलेली खतेच मिळत नसल्याची ओरड आता भूम आणि कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांतून होवू लागली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून केला जात असलेला दावा किती पोकळ आहे, हे समोर येते.मागील तीन-चार दिवसांमध्ये जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे खत, बी-बियाणे खरेदी करण्यासाठीची लगबग सुरू केली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. नामांकित कंपन्यांचे उपलब्ध होत नसल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. भूम तालुक्यामध्ये १०:२६:२६, १२:३२:१६, १५:१५, २०:२०:१०, २४:२४:०० या खताचे शॉर्टेज असल्याचे सांगण्यात येते. याबाबत कृषी दुकानदारांकडे विचारणा केली असता महाराष्ट्र औद्योगिक कृषी महामंडळ आणि फेडरेशनकडून खत उपलब्ध झाले नसल्याचे ते म्हणतात. दरम्यान, हीच अवस्था कळंब तालुक्यातही पहावयास मिळते. पाऊस पडतो न पडतो आणि पेरणी सुरू होते न होते, तोच बाजारामध्ये खताचे शॉर्टेज निर्माण झाले आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेले १८:४६, १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा कृत्रिम स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात आहे. शासनाच्या संबंधित विभागाने खत तसेच कापसाच्या ‘बीटी’ वाणाचे दर जाहीर करणे आवश्यक होते. बहुतांश शेतकऱ्यांना दराची कल्पना नाही. शेतकऱ्यांनी खताची मागणी केली असता, कधी खत नाही असे सांगितले जात आहे. तर कधी दुकानदार सांगेल त्या दराने खरेदी करावे लागत आहे.
वाशीमध्ये कापूस,भूम-कळंबमध्ये खताचा तुटवडा !
By admin | Updated: July 11, 2014 00:59 IST