औरंगाबाद : घाटीतील निवासी डॉक्टरला सोमवारी रात्री रुग्णाच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाली. या घटनेनंतर घाटीतील सुमारे २४० निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. या संपाचा फटका तेथे उपचार घेत असलेल्या सामान्य रुग्णांना बसला. सोमवारी नियोजित करण्यात आलेल्या सुमारे ४० शस्त्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाला घ्यावा लागला. वॉर्ड क्रमांक २५ मध्ये अॅडमिट असलेल्या ८ वर्षीय मुलीच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती डॉक्टरांनी तिच्या आईला दिली. डॉक्टरांनी माहिती देताच त्या मुलीच्या आईला मानसिक धक्काच बसला. त्यानंतर ती आरडाओरड क रू लागली. नातेवाईक तिला घेऊन अपघात विभागात आले. मेडिसीन विभागातील निवासी डॉक्टर हेमंत चिमुटे यांनी तिला तपासले आणि एक इंजेक्शन दिले. त्यानंतर ते दुसऱ्या रुग्णावर उपचार करू लागले. तेव्हा तिच्यासोबत असलेल्या ५ ते ६ नातेवाईकांनी डॉ. हेमंत यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला आणि नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी तेथे सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र, त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप मार्ड संघटनेने घेतला. या घटनेची माहिती सर्व निवासी डॉक्टरांना मिळताच त्यांनी मध्यरात्रीपासूनच काम बंद आंदोलन सुरू केले. सर्व निवासी डॉॅक्टर जमा झाले आणि त्यांनी बेगमपुरा ठाणे गाठून मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदविली. घाटीचे अधिष्ठाता, मेडिसीन विभागप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक हेसुद्धा बेगमपुरा ठाण्यात यावेळी उपस्थित होते.
घाटीचे डॉक्टर संपावर
By admin | Updated: October 8, 2014 01:08 IST