उस्मानाबाद : महसूल यंत्रणेत तलाठी हा गावपातळीवरील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असणारे अभिलेखे अद्ययावत असणे गरजेचे आहे. यासाठी जिलञह्यातील सर्व तलाठ्यांनी त्यांचे दप्तर आणि रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत गैरशस्त आणि कामातील दिरंगाई सहन करण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकरी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी जिल्ह्यातील तलाठ्यांची ई-महाभूमी योजनेसंदर्भात कार्यशाळा पार पडली. यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकरी शिल्पा करमरकर, उपविभागीय अधिकारी शोभा राऊत, रवींद्र गुरव, सचिन बारवकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी कोंडेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले, महसूल रेकॉर्ड अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम आवश्यक आहे. यासाठी त्यातील रेकॉर्ड बिनचूक असणे आवश्यक असून, तलाठ्यांनी त्यांच्या कामाचे सखोल ज्ञान मिळवून त्याचा उपयोग करावा. तलाठी हा महसूल यंत्रणेचा गावपातळीवरील प्रमुख आहे. त्याने त्याच्या कामातून ते प्रमुखपद टिकविले पाहिजे. प्रत्येक तलाठ्याने त्यांच्या सज्जात नियमित उपस्थित रहावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शिस्त या दोन गोष्टी काम करताना आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.यावेळी अपर जिल्हाधिकारी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ई-फेरफारसाठी राज्यातून कळंब तहसील कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. येत्या १५ आॅगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिवसभराच्या या कार्यशाळेत विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)आज्ञावली कार्यान्वितमहाराष्ट्र राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण या ‘ई-महाभूमी’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे. याशिवाय गाव नमुन्यांचे संगणकीकरण करण्यासाठी ई-चावडी ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. तसेच फेरफार प्रक्रिया आॅनलाईन करण्यासाठी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. यामुळे महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता येणार आहे. कोठेही आणि केव्हाही विनाविलंब भूमी अभिलेखे यामुळे उपलब्ध होणार आहेत. आपला जिल्हा हा राज्यात या बाबतीत आघाडीवर असून, येत्या सहा महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यातील महसूल अभिलेख्यांचे अद्यावतीकरण करण्याचा प्रयत्न सर्व तलाठ्यांनी करावा. त्यासाठीची संपूर्ण सहाय्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
तलाठ्यांनी महसूल दप्तर अद्ययावत करावे
By admin | Updated: July 3, 2014 00:19 IST