औरंगाबाद : शहागंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून जवळपास एक वर्ष होत आले. अनावरण कार्यक्रम घेण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडत नव्हता. २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण कार्यक्रम ठेवण्यासाठी महापालिकेची लगबग सुरू झाली. कार्यक्रम पत्रिकेत आणि कोनशिलेवर माजी खा. चंद्रकांत खैरे आणि या भागातील माजी नगरसेविका यशश्री बाखरिया यांची नावे नव्हती. त्यामुळे वाद उफाळून आला. शेवटी मनपा प्रशासनाला अनावरण कार्यक्रमच रद्द करावा लागला.
दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त नागरिक शहागंज येथे गर्दी करतात. चमनमध्ये पूर्वी अर्धाकृती पुतळा होता. अनेक वर्षांपासून नागरिक पूर्णाकृती पुतळा बसवावा, अशी मागणी महापालिकेकडे करीत होते. तीन वर्षांपासून महापालिकेने पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम सुरू केले. पुतळ्यासाठी १८ लाख रुपये खर्च करून चौथरा बांधण्यात आला. ५० लाख रुपये पूर्णाकृती पुतळ्यासाठी खर्च करण्यात आले. यानंतरही काम पूर्ण होत नसल्यामुळे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी ४० लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. त्यातील फक्त १९ लाख रुपये महापालिकेला प्राप्त झाले. निधी नसल्यामुळे सौंदर्यीकरण आणि इतर कामे प्रलंबित आहेत. त्यातच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन सोमवारी प्रशासनाकडून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी नगरसेविका यशश्री बाखरिया यांची नावे नव्हती. त्यामुळे शिवसेनेने कार्यक्रमाला कडाडून विरोध दर्शविला. शेवटी सायंकाळी प्रशासनाने दोन पावले मागे येत कार्यक्रमच रद्द केला.