लाडसावंगी : परिसरात आधीच कमी पाऊस यात पेरुवर अज्ञात रोग पडल्याने झाडे पिवळी पडून उभी झाडे वाळू लागली आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असताना कृषी खाते मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
लाडसावंगी परिसरात गेल्या तीन ते चार वर्षांपासून डाळिंब पिकावर तेल्या, करपा, प्लेग आदी रोग पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा तोडून टाकल्या. यानंतर बरेचशे शेतकरी पेरु लागवडीकडे वळाले आहेत. परंतु जूनपासून या पेरुंच्या बागांवरही अज्ञात रोगाने थैमान घातले आहे. पेरुची उभी झाडे आधी पिवळी पडतात व नंतर ते वाळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी याविषयी कृषी विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांसह कृषी शास्त्रज्ञांकडे मदत मागितली. मात्र, कोणीही प्रत्यक्ष पाहणीसाठी आले नाहीत. उलट उंटावरुन घोडे राखत असून मला आम्हाला व्हॉटस्ॲपवर बाधित झालेल्या झाडांची छायाचित्रे पाठवा असे सांगत आहेत. काहींनी फोटो पाठवून याबाबत मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आधीच पावसाळा संपत आला, तरीही लाडसावंगी परिसरात एकही मोठा पाऊस झालेला नसल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आलेला नाही. यामुळे धरणे, तलावात पाणीसाठा झालेला नाही. हे संकट कमी की, काय आता पेरु बागाही संकटात सापडल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
चौकट
कृषी सहाय्यक फिरकत नाहीत
कोरोना महामारीचे कारण सांगून कृषी सहाय्यक हे कार्यक्षेत्रात फिरकत नसल्याने शेतकऱ्यांना खरीप पिकांसह फळबागांच्या रोगराई विषयी माहिती मिळत नाही. तसेच शेततळे, त्यात टाकलेले प्लॅस्टिक अस्तरीकरण, नवीन शेततळे आदींची कामे रखडल्याने कृषी खाते नेमके कशासाठी, व कुणासाठी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन कार्यक्षेत्रात न येणाऱ्या कृषी सहाय्यकांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो :
230821\img_20210813_074003.jpg
अज्ञात रोगाने लाडसावंगी परिसरात पेरुची झाडे अशी वाळून जात आहे.