औरंगाबाद : केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये १ हजार लोकसंख्येमागे केवळ १६ जणांना सद्यस्थितीत नोकरी प्राप्त होत आहे. जगातील नॉर्वेमध्ये हेच प्रमाण १५९, स्वीडन १३८, फ्रान्स ११४, ब्राझील १११, अमेरिका ७७ आणि चीनमध्ये ५७ असे आहे. भारतात सुशासन निर्माण होत नाही. यासाठी सरकारी नोकर भरतीवर घातलेले निर्बंध हेच कारण आहे, असा दावा ज्येष्ठ कामगार नेते तथा अर्थविषयक अभ्यासक प्रा. अजित अभ्यंकर यांनी केला. देशातील बेरोजगारी धोक्याच्या पातळीवर पोहचली आहे. त्याकडे प्रत्येकाला लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसंवाद फाउंडेशनतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'अबकी बार सिर्फ रोजगार ' या विषयावर प्रा. अजित अभ्यंकर यांचे रविवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. मारोती तेगमपुरे होते. प्रा. अभ्यंकर म्हणाले, कोरोनाच्या काळात विविध यंत्रे खरेदी केली. तेव्हा ते चालविण्यासाठी माणसे उपलब्ध नव्हती. कारण या विभागांमध्ये नोकरभरतीच केलेली नाही. उपकरणे खरेदी करता येऊ शकतात. पण ती चालवणारी सुशासन यंत्रणाच अस्तित्वात नसल्यामुळे आपली धांदल उडाली. याला केंद्र आणि राज्य शासनाची धोरणे कारणीभूत आहेत. बेरोजगारी निर्माण होण्याची कारणे अनेक आहेत. त्यावर अनेक उपायही आहेत. त्यासाठी आर्थिक धोरण बदलण्याची गरज आहे. शासनाने विकासाच्या कार्यक्रमाची दिशा बदलली पाहिजे. नफ्यासाठी राज्य यंत्रणा चालवायच्या असतील तर हे शक्य होणार नाही. रोजगारासाठी राष्ट्रीय पातळीवर नागरी रोजगार हमी योजना सुरू केली पाहिजे. यात नागरी आणि ग्रामीण जीवन, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि सर्वांना शिक्षण क्षेत्रात कार्य करावे लागणार असल्याचेही प्रा. अभ्यंकर यांनी सांगितले. रोजगाराच्या प्रश्नावर प्रत्येक संघटना, संस्था यांनी 'अब की बार सिर्फ रोजगार' हीच मागणी लावून धरली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा जिवरग यांनी केले. आभार डॉ.फिरोज सय्यद यांनी मानले. व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरे घेण्यात आली.
चौकट,
कृषी क्षेत्रात ४४ टक्के लोक काम करतात
कृषी क्षेत्रात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ७२ टक्के लोक काम करीत होते. आता ते प्रमाण ४४ टक्क्यांवर आले आहे. मात्र या ४४ टक्के लोकांचे उत्पन्न केवळ १४ टक्के एवढेच आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील रोजगार घटून इतर क्षेत्रात वाढले पाहिजेत. तरच शेतीला चांगले दिवस येतील, असे प्रा. अभ्यंकर यांनी सांगितले.