औरंगाबाद : पोलिसांच्या कारवाईनंतर बंद पडलेले अनधिकृत बार पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे राजरोस तेथे मद्य प्राशन करू दिले जात नाही. नेहमीच्या ग्राहकांना दारूपिण्याची मुभा दिली जात असली, तरी नवख्या ग्राहकांची विचारपूस केली जाते. ग्राहकांकडून कसलाही ‘धोका’ होणार नाही, याची खात्री पटल्यानंतर मद्य प्राशन करण्यास परवानगी दिली जाते. ग्राहकांजवळील दारू पाण्याच्या जगमध्ये रिकामी करून घेतल्यानंतर बाटल्यांचा पुरावा आधी नष्ट केला जात असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये आढळून आले.गेल्या काही वर्षांपासून शहरात अनधिकृत बारचे पेव फुटले होते. ‘फॅमिली रेस्टॉरंट’च्या नावाखाली हॉटेल चालविण्याचा परवाना घेऊन अनेक ठिकाणी अनधिकृत बार थाटण्यात आले होते. त्रिमूर्ती चौक, गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्ता, रोपळेकर चौक, उस्मानपुरा, औरंगपुरा, सिडको, हडको, जळगाव रोड, बीड बायपास, जालना रोड, पडेगाव, मिटमिटा, गारखेडा, विभागीय क्रीडा संकुल परिसर, जवाहरनगर पोलीस ठाणे परिसर, रेल्वेस्टेशन परिसर, अशा शहराच्या सर्व भागांत अनधिकृत बार सुरू करण्यात आले होते. संबंधित पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाशी ‘अर्थपूर्ण’ चर्चा केल्यानंतर ग्राहकांना मद्य प्राशन करण्यास जागा उपलब्ध करून दिली जात असे. बहुतांश अनधिकृत बार हे वाईन शॉपजवळच उघडण्यात आले होते. वाईन शॉपमधून पार्सल घेऊन या, जेवण्याची आॅर्डर द्या आणि मनसोक्त दारू प्या, असा खुलेआम धंदा यातून होत होता. गेल्या वर्षी मे महिन्यात पोलिसांनी अनधिकृत बारविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू केले. त्यामुळे काही अनधिकृत बारला कायमचे टाळे लागले. काहींनी फक्त हॉटेल चालविणे पसंत केले. इतरांनी मात्र, हा व्यवसाय पुन्हा सुरू केल्याचे आढळून आले. सिडको एन-२, चिश्तिया कॉलनी, अग्रसेन चौक परिसर या भागातही काही अनधिकृत बार सुरू असल्याचे पाहणीत आढळून आले. याशिवाय आॅम्लेटच्या काही हातगाड्यांवरही ग्राहकांना पिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे दिसून आले.
शहरातील अनधिकृत बार पुन्हा सुरू
By admin | Updated: June 11, 2016 00:17 IST