धावडा : भोकरदन तालुक्यातील वडाळा येथील दोन तरुणावर तीन अस्वलांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. धावडा शिवारात असलेल्या वडाळी येथील तरूण सुरेश कडुबा इंगळे वय २८, व देवाजी भगवान गवळी वय ३० हे दोघे नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी वडाळा शिवारातील डोंगरावर गेले असता डोंगरात अस्वलांनी आपल्या दोन पिल्लासह त्यांच्यावर हल्ला केला. यात सुरेश इंगळे हा गंभीर जखमी झाला तर देवाजी गवळी याच्या हात आणि पायावर अस्वलाने चावा घेतला. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोघांना वाचविले. त्यांना तात्काळ बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी वनक्षेत्र अधिकारी व्ही.एन.गायकवाड, वनपाल व्ही.जी. सुरडकर यांची घटनास्थळी भेट देऊन अस्वलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जखमींच्या चौकशीसाठी रुग्णालयात जाणार असल्याचे सांगितले.दरम्यान या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुराखीही आपली जनावरे या परिसरात नेण्यासाठी धास्तावले आहेत. या परिसरात अस्वलासारखे वन्यप्राण्यांचाही वावर वाढला आहे. वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
वडाळा येथील दोन तरुणावर अस्वलाचा हल्ला
By admin | Updated: December 18, 2014 00:35 IST