औरंगाबाद : फिरण्यासाठी सातारा तांडा परिसरातील तलावावर गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर त्यांचे दोन मित्र बालंबाल बचावले. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली.गणेश लिंबाजी धातपडे (१८) व राहुल भरत शिंदे (१९) अशी या दुर्घटनेत मरण पावलेल्या युवकांची नावे आहेत. दोघेही पुंडलिकनगर परिसरातील गजानननगरातील रहिवासी आहेत. गणेश हा तंत्रनिकेतनचा विद्यार्थी होता, तर राहुल बारावीत शिक्षण घेत होता. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, गणेश, राहुल व त्यांचे मित्र जयेश निकम आणि रवी वैद्य हे चौघे आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी म्हणून सिंदोन रोडवर सातारा तांड्याच्या पुढे असलेल्या तलावावर पोहोचले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या तलावात बरेच पाणी आहे. या चौघांनी तलावाच्या काठावर बसून बराच वेळ मौजमस्ती केली. मग, त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह झाला. वास्तविक पाहता चौघांनाही पाण्यात पोहता येत नव्हते, तरीही गणेश, राहुल पाण्यात उतरले. ते पाण्यात पुढे पुढे जाऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ जयेश आणि रवी तलावात उतरले. त्याचवेळी पुढे गेलेले गणेश आणि राहुल बुडत असल्याचे या दोघांच्या लक्षात आले. हे पाहून जयेश आणि रवी पोहता येत नसल्याने तात्काळ मागे फिरले. कसेबसे ते तलावातून बाहेर आले. मात्र, गणेश आणि राहुल काही वर येईनात. तेव्हा वर आलेल्या दोघांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी जवळपास कुणीही नव्हते. त्यामुळे त्यांना मदत मिळू शकली नाही.
तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू
By admin | Updated: September 16, 2014 01:37 IST