जालना : विक्रेत्यासह दुकानातील नोकरांची नजर चुकवून हातचलाखीने साड्या चोरून नेणाऱ्या टोळीतील दोन महिलांना अटक करण्यात सदर बाजार पोलिसांना यश आले आहे. जानेवारी महिन्यात घडलेल्या शहरातील या घटनेचा पर्दाफाश २५ दिवसानंतर रविवारी झाला. शहरातील कपडाबाजार भागात २० जानेवारी रोजी दुपारी श्रीराम बुटीक या दुकानात तीन महिला साड्या खरेदीसाठी आल्या. सर्वसाधारणपणे ५० ते ६० वर्षे वयाच्या या महिलांनी बराचवेळा वेगवेगळ्या किंमतीच्या साड्यांची पाहणी केली. परंतु साड्या पसंत नसल्याचे सांगत या तिन्ही महिला तेथून निघून गेल्या. मात्र ग्राहकांना दाखविलेल्या साड्या परत जागेवर ठेवताना त्यातील १२ हजार ७४० रुपये किंमतीच्या चार साड्या गायब झाल्याचे लक्षात आले. दुकानाचे संचालक राधेश्याम राजेंद्रप्रसाद सोनी (वय २६) यांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बघितले असता, त्याच तीन महिलांनी या साड्यांची चोरी केल्याचे निदर्शनास आले. सोनी यांनी लगेच सदर बाजार पोलिस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिली. परंतु पोलिसांनी हे प्रकरण चौकशीसाठी ठेवून शोध सुरू केला. या फुटेजवरून त्या तिन्ही महिलांची छायाचित्रे तयार करून ती गस्तीवर असणाऱ्या पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आली. या प्रकरणाच्या २५ दिवसानंतर १५ फेबु्रवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास शहरातील रामनगर भागात पोलिस जमादार विठ्ठल सोळंके, गवळी, महिला पोलिस ज्योती राठोड व अन्य एक असे चारजण गस्तीवर होते. त्याचवेळी त्यांना दोन महिला संशयितरित्या फिरताना आढळून आल्या. ताब्यात असलेल्या छायाचित्रातील महिलांशी त्यांचे साम्य असल्याचे लक्षात आल्याने या पोलिसांनी दोन्ही महिलांना तात्काळ ताब्यात घेतले.या दोन्ही महिलांना सदर बाजार पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या महिलांनी नंतर मात्र कपडाबाजार भागातील चोरीच्या गुन्ह्याची कबूली दिली. दुकानाचे संचालक सोनी यांनी चोरीच्या गुन्ह्यातील या दोनपैकी एका महिलेची ओळख पोलिसांना पटवून दिली. शैलाबाई बापू कुऱ्हाडे (वय ५०) व साखराबाई खिमाजी बकळे (वय ६०, दोन्ही राहणार आंबेडकरनगर, औरंगाबाद) अशी महिला आरोपींची नावे आहेत. त्यांची अन्य एक सहकारी फरार असल्याचे समजते. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे जमादा सोळंके यांनी सांगितले.या अटकेतील महिलांकडून शहर व परिसरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. सायंकाळपर्यंत चौकशी सुरू होती.सध्या सोशल नेटवर्कवर बहुचर्चित असलेल्या चोरीच्या प्रकारांपैकीच एक प्रकार या महिला चोरांनी वापरला. साड्या बघण्याचे निमित्त करून तिन्ही महिलांनी दुकानदार आणि त्यांच्या नोकरांची नजर चुकवून अंगातील साडीच्या आतील बाजूने पेटीकोटला तयार केलेल्या पिशवीमध्ये दुकानातील साड्या टाकल्या. नंतर साड्या पसंत नसल्याचे सांगून त्या दुकानातून बाहेर पडल्या, असे पोलिसांनी सांगितले.
साड्या चोरणाऱ्या टोळीतील दोन महिला गजाआड
By admin | Updated: February 16, 2015 00:51 IST