नळदुर्ग : सासरच्या जाचास कंटाळून नळदुर्ग (ता़तुळजापूर), भगतवाडी (ता़उमरगा) येथील विवाहितेने आत्महत्या केली़ ही घटना मंगळवारी घडली असून, या प्रकरणी बुधवारी सासरच्या दोघांविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नळदुर्ग येथील एका विवाहितेस तिचा पती व इतर एकाने तुला मुलबाळ होत नाही, ट्रक घेण्यासाठी माहेरहून एक लाख रूपये घेवून ये म्हणून सतत शारीरिक, मानसिक जाच केला़ या जाचहटास कंटाळून विवाहितेने मंगळवारी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले़ यात गंभीररित्या होरपळलेल्या विवाहितेचा मृत्यू झाला़ या प्रकरणी तिच्या मृत्यूस पती व इतर एकजण कारणीभूत असल्याची फिर्याद नळदुर्ग पोलिस ठाण्यात देण्यात आली होती़ या फिर्यादीवरून पतीसह इतर एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ शिंदे हे करीत आहेत़उमरगा तालुक्यातील भगतवाडी येथील विवाहितेस तिचा पती व इतर तिघांनी संगणमत करून दुचाकी घेण्यासाठी माहेरवरून ५० हजार रूपये घेवून ये म्हणून सतत शारीरिक, मानसिक जाचहट केला़ सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ११ डिसेंबर रोजी शेतातील गोठ्यातील आडूस गळफास लावून आत्महत्या केली़ तिच्या आत्महत्येस पतीसह सासरचे इतर मंडळी जबाबदार असल्याची फिर्याद उमरगा पोलिस ठाण्यात देण्यात आली होती़ या फिर्यादीवरून सासरच्या चौघाविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि गायकवाड हे करीत आहेत़ (वार्ताहर)
दोन विवाहितांची आत्महत्या
By admin | Updated: December 19, 2014 00:56 IST