सिल्लोड : विहिरीवरील क्रेन काढत असताना तोल गेल्याने दोन तरुण मजुरांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना तालुक्यातील धानोरा येथे गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा प्रभात काकडे (३५), रा.धानोरा, कौतिक श्रीरंग भारती (२५), रा. आसडी, ता. सिल्लोड असे मयत तरुणांची नावे आहेत. हे मजूर धानोरा शिवारात विहीर खोदकामावर मजुरीचे काम करीत होते. विहिरीचे काम पूर्ण झाल्याने विहिरीवरील क्रेन काढत असताना त्यांचा तोल गेल्याने दोघे विहिरीत पडले. यात ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी विहिरीकडे धाव घेऊन दोघांना बाहेर काढून त्यांना तात्काळ उपचारासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. रुग्णालयात आणत असताना कृष्णा काकडे यांचा वाटेतच मृत्यू झाला. कौतिक भारती हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविले असता त्यांचाही वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल अनंत पाचंगे यांनी दिली. सदर तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने धानोरा व आसडी पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे डॉॅ. चव्हाण यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यास खबर दिली. पुढील तपास जमादार अनंत पाचंगे करीत आहेत. (वार्ताहर)
विहिरीत पडून दोन मजुरांचा मृत्यू
By admin | Updated: May 23, 2014 01:05 IST