फकिरा देशमुख, भोकरदनश्रेय लाटण्यासाठी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन दोनवेळा करण्याचा अनोखा प्रकार लोकप्रतिनिधींकडून होत असल्याने जनतेची चांगलीच करमणूक होत आहे. मात्र यात प्रशासकीय यंत्रणा भरडली जात आहे. केदारखेडा व ईटा येथील पूर्णा व गिरजा नदीवरील मंजूर करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे श्रेय लाटण्याचा प्रकार खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आमदार चंद्रकांत दानवे यांच्याकडून होत आहे. २६ जुलै रोजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले. तर याच बंधाऱ्याचे भूमिपूजन २८ जुलै रोजी राज्याचे जलसंधारण राज्यमत्री सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आ. चंद्रकांत दानवे यांनी दिल्यामुळे या दोघांमधील राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.केदारखेडा येथील पूर्णा नदीच्या पात्रावर शासनाने ४ कोटी ३८ लाख तर ईटा येथील गिरजा नदीच्या पात्रावर ४ कोटी १५ लाख रुपये खर्चाच्या कोल्हापुरी बंधाऱ्याला मंजुरी दिली. ही मंजुरी आपल्या प्रयत्नामुळे झाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. चंद्रकांत दानवे, आ. संतोष सांबरे हे ठामपणे सांगत आहेत. २६ जुलै रोजी केंद्रीय मंत्री दानवे व बदनापूर मतदारसंघाचे आमदार संतोष सांबरे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे यांच्यासह भाजपा-सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर २५ जुलै रोजी आ. चंद्रकांत दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना आपण या बंधाऱ्याचे भूमिपूजन जलसंधारण राज्यमंत्री सुरेश धस यांच्या हस्ते करणार असल्याचे सांगितले होते. धस यांच्या शासकीय दौऱ्याची प्रतही त्यांनी पत्रकारांना दिली. यात वरील दोन्ही बंधाऱ्यांसह केळणा नदीच्या पात्रावरील बंधाऱ्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचाही समावेश आहे. दोन बंधाऱ्यांचे भूमिपूजन दुसऱ्यांदा होत असल्याने या भागातील जनतेची चांगलीच करमणूक होणार आहे. मात्र या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वादात कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामात काही अडथळा तर येणार नाही ना, अशी चर्चा भोकरदन तालुक्यात सुरू आहे.लुडबूड करू नये - सांबरे‘भोकरदनचे आमदार चंद्रकांत दानवे यांनी आ़ चंद्रकांत दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष द्यावे, उगाच माझ्या मतदारसंघात लुडबुड करून नाक खुपसू नये’ असे बदनापूरचे आमदार संतोष सांबरे यांनी म्हटले आहे. सांबरे पुढे म्हणाले की, पालकमंत्री राजेश टोपे व आ. दानवे यांनी २००३ मध्ये जवखेडा ठोंबरी येथे पूर्णा नदीवर बंधाऱ्याचे भूमिपूजन केले होते, त्याचे काय झाले हे सांगावे. केदारखेडा व ईटा येथे कोल्हापुरी बंधारे मंजूर करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्यासमवेत जाऊन आपण संबंधित खात्याचे मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला व बंधारे मंजूर करवून आणले. यात आ. दानवेंचा कवडीचाही संबंध नाही, असेही सांबरे म्हणाले....तर राजीनामा देऊ - चंद्रकांत दानवेआ़ चंद्रकांत दानवे म्हणाले, मतदारसंघ पुनर्रचनेप्रमाणे ही गावे माझ्या मतदार संघात होती. तेव्हापासून गिरजा, पूर्णा या नदीवर बंधारे होण्यासाठी आपण प्रस्ताव तयार केला होता. ही बंधारे मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राजेश टोपे यांनी जलसंपदामंत्री नितीन राऊत व राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या बाबतचे सर्व पुरावे माझ्या जवळ आहेत. आ़ सांबरे यांना तर या बंधाऱ्याची साईट देखील माहिती नव्हती. तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे खोटे काम रेटून नेण्यात पटाईत आहेत, हे कोणाला सांगण्याची गरज नाही, असे सांगून हे बंधारे माझ्या प्रयत्नाशिवाय मंजूर करून आणल्याचे सिद्ध करून दाखविल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.अधिकारी ‘नॉट रिचेबल’बंधाऱ्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ सुरू असल्याने अधिकारी व कर्मचारी चांगलेच कात्रीत सापडले आहेत. अधिकृत भूमिपूजन कोणाचे ? याची माहिती विचारण्यासाठी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अभियंता सत्तारखान, उपअभियंता कांबळे यांच्यासह संबंधित कर्मचारी सकाळपासूनच ‘नॉट रिचेबल’ होते.
दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दोनदा भूमिपूजन !
By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST