औरंगाबाद : मध्य मतदारसंघाचे आ.प्रदीप जैस्वाल यांना शिवसेनेतूनच रोखण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच मध्य मतदारसंघासाठी सेनेतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे जेथे-जेथे डावलणे शक्य होईल तेथे त्यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये आ.जैस्वाल यांनी सुचविलेल्या एकाही सदस्याला घेतले नाही. नगरसेविका संगीता अहिरे आणि समीर राजूरकर यांची नावे त्यांनी सुचविली होती. नगरसेवक त्र्यंबक तुपे यांना सदस्यपद देऊन एकप्रकारे राजेंद्र जंजाळ यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे. जंजाळ हे आ.जैस्वाल समर्थक आहेत. मात्र, २०१० च्या मनपा निवडणुकीत ते तुपे यांच्या विरोधात शहर प्रगती आघाडीकडून लढले होते. आ.जैस्वाल जरी सेनेत आले असले तरी त्यांच्या शहर प्रगती आघाडीला सेना आपले मानत नसल्यामुळे जंजाळ, अहिरे, राजूरकर यांची कोंडी झालेली आहे. मध्य मतदारसंघातून सेनेकडून निवडणूक लढविण्यास आ.जैस्वाल, माजी आ.किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची इच्छा आहे. तर उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले यांनीदेखील मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी एक सर्वे केला आहे. सभागृह नेतेपदाचा निर्णय निकालानंतर महापालिका सभागृह नेतेपदाचा विषय सध्या अडगळीला पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच पदावर कुणाची वर्णी लावायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. खा.चंद्रकांत खैरे यांनी नगरसेवक किशोर नागरे यांचे नाव लावून धरले होते. मात्र, ३० एप्रिल रोजी स्थायी समिती सदस्यांची निवड झाली. सभागृह नेतेपदाचा विषय त्या दिवशी पुढे ढकलण्यात आला आहे. आ.प्रदीप जैस्वाल यांनी समीर राजूरकर यांना स्थायी समितीमध्ये पाठविण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, त्यांचा प्रयोग यशस्वी झाला नाही. सभापतीपदासाठी रस्सीखेच जगदीश सिद्ध किंवा त्र्यंबक तुपे यांच्यापैकी एकाची सभापतीपदावर वर्णी लागणार आहे. मातोश्रीवर निर्णय होणार असल्याचे सध्या सांगितले जात असले तरी सिद्ध यांना खा.खैरे यांनी सभापती करण्याचा शब्द दिला आहे. आ.जैस्वालदेखील त्यांच्या बाजूने आहेत. तर तुपे यांना सेनेच्या पश्चिम आघाडीने शब्द दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मध्य आणि पश्चिम अशी रस्सीखेच सभापतीपदासाठी सुरू आहे.
जैस्वाल यांना रोखण्यासाठी सेनेतून प्रयत्न
By admin | Updated: May 13, 2014 00:57 IST