औरंगाबाद : सामान्य गुंतवणूकदारांना दरमहा लाखो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या नाशिक येथील ट्रू लाईफ कंपनीचा गत सप्ताहात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. कंपनीच्या रुबी क्लब सदस्यांनी वर्षभरात लाखो रुपयांची कमाई केली. मात्र, या मेंबर्सच्या बँक खात्याची पोलिसांनी पाहणी केली असता काहींच्या खात्यावर केवळ ४५ रुपये, तर काहींच्या खात्यात ४००- ७०० रुपये आढळले आहेत. जनतेच्या पैशांची त्यांनी उधळपट्टी केल्यानेच त्यांचे पासबुक आज कोरे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १४ मे रोजी तापडिया नाट्यमंदिर येथे ट्रू लाईफ कंपनीच्या सेमिनारदरम्यान छापा टाकला होता. याप्रसंगी पोलिसांनी अटकेत असलेला संस्थापक दीपक सूर्यवंशी, कंपनीचे रुबी क्लब सदस्य राजेंद्र भुसे, शंकर निकम, अरुण मोगल, परमेश्वर लोंढे, डॉ. संदीप बांडे, रविराज राठोड हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. २५ मेपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या घरांची आणि कार्यालयांची पोलीस झडती घेत आहेत. त्यांच्या बँक खात्यातील माहिती जाणून घेत आहेत. मंगळवारी नाशिक येथील दीपक सूर्यवंशीच्या कार्यालय आणि घराची झडती घेतली. तर दोन दिवसांपूर्वी जालना येथील एका आरोपीची घरझडती घेण्यात आली. शिवाय अन्य आरोपींच्या कार्यालयांची झडती घेण्याचे काम सुरू आहे. आरोपींच्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी जाणून घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. अटकेतील सर्वच रुबी क्लब सदस्यांनी कमीत कमी २ लाख आणि जास्तीत जास्त १४ लाख रुपये एक वर्षभरात कमाई केल्याचे पोलिसांना समजले. डॉ. संदीप बांडे या आरोपीने वर्षभरात १४ लाख रुपये कमाई केल्याचे सेमिनारच्या दिवशी जाहीरपणे सांगितले होते. सर्व रुबी क्लब सदस्यांना कंपनीकडून बँक खात्यात कमिशनपोटी काही रक्कम जमा केली जात होती. डॉ. बांडे याच्या खात्यात केवळ ४५ रुपये पोलिसांना आढळले आहेत.
‘ट्रू लाईफ’च्या रुबी सदस्यांची उधळपट्टी
By admin | Updated: May 22, 2016 00:31 IST