\S-
साडेतीन कोटींची विक्री : जागतिक आरोग्य संघटना म्हणते रेमडेसिवीरचा प्रभाव दिसला नाही, तर तज्ज्ञ म्हणतात बाधितांसाठी प्रभावी ठरले इंजेक्शन
--
औरंगाबाद : कोरोनावर प्रभावी इंजेक्शन म्हणून वापरल्या गेलेल्या रेमडेसिवीरच्या आतापर्यंत जिल्ह्यात ८१३७ कुप्प्यांची विक्री झाली. सुमारे साडेतील कोटींच्या इंजेक्शनचा वापर १३५७ बाधितांच्या उपचारात केला गेला. हे इंजेक्शन बाधितांच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचा दावा तज्ज्ञ आजही करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचे विशेष परिणाम किंवा त्यामुळे मृत्यू टाळता येतो, असेही दिसून आले नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे या इंजेक्शनच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जगात कोरोनाची माहामारी सुरू होऊन वर्ष सरले. काही देशांत दुसरी लाट सुरू झाली. भारतातही कोरोनाचा कहर पुन्हा वाढतो आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रेमडेसिवीरला खूप प्रभावी मानल्या गेले. एका रुग्णाला हे सहा इंजेक्शन द्यावे लागतात. एका कुपीसाठी ५ ते १० हजारांची किंमत बाधितांच्या नातेवाईकांनी मोजली. बाधितांकडूनही रेमडेसिवीरचा हट्ट धरल्या गेला. सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या खूप वाढली. त्यावेळी शहरात दररोज चारशे ते पाचशे इंजेक्शनची मागणी होती. तुटवड्याच्या परिस्थितीत अन्न औषध प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवून आवश्यक इंजेक्शनची उपलब्धता करून दिली. सध्या रुग्णसंख्या घटलेली आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत ८६३८ इंजेक्शन जिल्ह्यात उपलब्ध झाले. आतापर्यंत ८१३७ इंजेक्शन वापरल्या गेले असून ४६५ शिल्लक असल्याचे औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी सांगितले.
--
तज्ज्ञ म्हणतात रुग्णांना फायदा
---
शासनाकडून रेमडेसिवीर वापरू नका अशा सूचना नाहीत. मात्र, रेमडेसिवीर उपयोगी ठरत असल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, ४१५० पैकी सध्या २७०८ इंजेक्शन शिल्लक आहेत. वापरलेल्या इंजेक्शनचा रुग्णाला फायदा झाला असून इंजेक्शन दिलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. घाटीत उपलब्ध केलेल्या ४ हजारपैकी ३ हजार ४०० इंजेक्शनचा वापर झाला असून ६०० औषध भंडारात शिल्लक आहेत. घाटीत कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरले आहे, असे मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.
---