शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ येथील चौकात एका बाजूने सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे़ दुसऱ्या बाजूवर पावसाचे पाणी थांबत असल्याने वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे़ त्यामुळे वाहनधारकांस त्रास सहन करावा लागत आहे़ वाहतूक सुरळीत करण्यासाठी चौकीदार नियुक्त करावा अशी मागणी होत आहे़शिरूर अनंतपाळच्या मुख्य रस्त्यास राज्य मार्गाचा दर्जा मिळाला आहे़ त्याचबरोबर हा मार्ग कर्नाटकासह उदगीर, देवणी या तालुक्यास जाण्यासाठी सर्वात जवळचा असल्याने या मार्गावरील वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय, स्थानिक वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथील मुख्य चौकात वाहतूक नियंत्रित करण्याची गरज आहे. सध्या या रस्त्यावर मजबुतीकरणाचे व चौकात सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे. त्यातच मुख्य रस्त्यावर दुभाजक झाल्याने उदगीर चौकासह मुख्य रस्त्यात तीन ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे तळे साचले आहे. परिणामी, याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत असून, दैनंदिन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना पायी ये-जा करीत असताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे़ मुख्य रस्त्यास राज्य मार्गाचा दर्जा मिळाल्याने नुकतीच येथे पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. लाखो रुपयांचे नुकसान सहन करून व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घेतले. आता तरी वाहतूक सुरळीत होऊन रस्त्याची दुरवस्था थांबेल, असे वाटत होते. परंतु, तसे न होता वाहतुकीची मोठी कोंडीच होत आहे. परिणामी पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ अपघातचे प्रमाणही काही प्रमाणात वाढल्याचे पहावयास मिळत आहे़ वाहतुकीची कोंडी सुरळीत होण्यासाठी मुख्य चौकात कायमस्वरूपी चौकीदाराची मागणी केली जात आहे.(वार्ताहर)चौकी आहे; चौकीदार नाही...मुख्य रस्त्यात लोकसहभागातून पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. परंतु, चौकीदारच नसल्याने वाहतूक नियंत्रणाचे काम करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकीदार नियुक्त करणार असे सांगूनही त्याची पूर्तता झाली नाही. सूचना दिल्या आहेत...याबाबत येथील पोनि. बंडोपंत मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, स्थानिक अंमलदार जाधव यांना वाहतुकीच्या नियंत्रणासाठी सूचना दिल्या आहेत.
वाहतुकीची कोंडी
By admin | Updated: July 14, 2014 01:00 IST