औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील वाहतूक सिग्नलचे टायमिंगचे सेटिंग चुकले आहे. परिणामी जालना रोडवर चौकाचौकांत वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. प्रत्येक सिग्नलवर वाहनचालकांना दोन ते तीन वेळा रेड सिग्नलचा सामना करावा लागत आहे. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे आकाशवाणी चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनचालकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात सध्या ८ लाख दुचाकींसह एकूण ११ लाख वाहने आहेत. यासोबतच बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांचीही यात भर पडत असते. जालना रोडवरून दर मिनिटाला साडेचारशे ते पाचशे वाहने धावत असतात. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात ३९ ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविलेले आहे. या सिग्नलमध्ये आणखी १२ सिग्नलची लवकरच भर पडणार आहे. जालना रोडवर महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ते चिकलठाणादरम्यान अकरा ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्यात आलेले आहेत. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस तैनात केलेले असता हे पोलीस वाहतुकीचे नियमन करीत असतात. वाहतूक सिग्नलची दुरुस्ती करण्याचे कामही महानगरपालिकेचे आहे. जालना रोडवरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येनुसार या अकरा वाहतूक चौकांतील सिग्नलचे टायमिंग सेट करणे आवश्यक आहे. एका चौकातून दुसऱ्या चौकात जाण्यासाठी वाहनांचा सरासरी वेग गृहीत धरून प्रत्येक सिग्नलचे टायमिंग सेट करणे आवश्यक असते. तसे झाल्यास एका चौकातून दुसऱ्या चौकात जाणाऱ्या वाहनचालकास सिग्नलवर थांबण्याची गरज भासत नाही. त्यामुळे वाहतूक सुरळीत चालते आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाही. मात्र, वाहतूक सिग्नलचे टायमिंगच चुकल्याने जालना रोडवरील प्रत्येक सिग्नलवर किमान दोन ते तीन वेळा रेड सिग्नलला सामोरे जावे लागते. त्यानंतरच त्यांना ग्रीन सिग्नल मिळतो. अमरप्रीत चौक, मोंढानाका आणि आकाशवाणी चौक सिग्नल येथे वाहनचालकांना रोज सकाळी ९ ते १ व सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते.
चौकाचौकांत होते ट्रॅफिक जाम
By admin | Updated: July 26, 2016 00:20 IST