औरंगाबाद : रविवारी सकाळी तोतया पोलीस पुन्हा अवतरले. देवदर्शनासाठी निघालेल्या वृद्ध महिलेला ‘खाक्या’ दाखवून या भामट्यांनी हातात दगड टेकवत तिचे तब्बल नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले. ही घटना सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास दिवाण देवडीतील नगरखाना गल्लीत घडली. दिवाण देवडीतील रहिवासी शोभा माणिकचंद बडजाते (६३) या नित्याप्रमाणे रविवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास देवदर्शनासाठी घरातून बाहेर पडल्या. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरखाना गल्लीच्या कोपऱ्यावरच एका जणाने त्यांना अडविले. ‘मी पोलीस आहे. तुम्ही पेपर वाचला नाही का? शहरात चोऱ्या चालू आहेत. त्यामुळे अंगावर दागिने घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. काढा ते दागिने. थांबा, आमचे साहेब येत आहेत’ असे तो म्हणाला. तितक्यात आणखी एक जण तेथे पोहोचला. त्याने ‘काढ ते दागिने आणि ठेव त्या पिशवीत’ असे दरडावले. घाबरलेल्या शोभा बडजाते यांनी अंगावरील दागिने काढण्यास सुरुवात केली. तितक्यात एका जणाने ‘हात रुमाल आहे ना तुमच्याकडे, दाखवा, त्यात दागिने बांधून देतो’ असे म्हणत त्यांचे नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने स्वत:कडे घेतले आणि ते रुमालात बांधून देण्याचे नाटक करीत हातचलाखीने दागिने काढून त्याजागी दगड आणि सोन्याच्या दोन नकली बांगड्या रुमालात बांधल्या. हा रुमाल बडजाते यांच्या पिशवीत टाकत ‘चला निघा आता घरी, दागिने घालून फिरू नका’ असे दरडावत दोन्ही भामटे तेथून पसार झाले. पोलिसांनी दरडावल्यामुळे घाबरलेल्या बडजाते घरी आल्या. ‘मला पोलिसांनी पकडले होते. त्यांनी माझे दागिने काढून रुमालात ठेवले’ असे मुलाला म्हणाल्या. मग दागिने पाहण्यासाठी रुमाल उघडला असता त्यात चक्क दगड आणि दोन नकली सोन्याच्या बांगड्या दिसून आल्या. या प्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंंदविण्यात आला.मला काही कळालेच नाहीयासंदर्भात ‘लोकमत’ शी बोलताना शोभा बडजाते म्हणाल्या, ‘अचानक या दोघांनी मला अडविले. पोलीस असल्याचे सांगून त्यांनी मला दागिने काढायला लावले. त्यांनी जसे सांगितले तसे मी करत गेले. त्यांनी मला भुरळच टाकली. त्यामुळे मला काही कळालेच नाही. ते निघून गेल्यानंतर मी धावत घरी आले. घरात पाय ठेवताच मला शुद्ध आली.
नऊ तोळे सोने नेले... अन् हाती दगड दिले!
By admin | Updated: July 7, 2014 00:44 IST