प्रताप नलावडे , बीडआषाढीचा सोहळा बुधवारी पंढरीत साजरा होत असतानाच बीड जिल्ह्यातही ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात आषाढीचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. वारकरी सांप्रदायाचे अधिकारी तीर्थक्षेत्र म्हणून बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचा उल्लेख केला जातो. अगदी अनेक वारकरी या ठिकाणांना ‘धाकटी पंढरी’ म्हणूनही संबोधतात.बीड शहरातील विजय टॉकीजजवळ ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत यांची समाधी आहे. आषाढीच्या सोहळ्यासाठी दरवर्षी आजोबांची पालखी नातवाच्या अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या भेटीसाठी जाते. आजोबा आणि नातवाच्या या भेटीचा सोहळा पाहणे हे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. बीडपासून अगदी जवळच असलेल्या चाकरवाडी येथे आषाढीचा सोहळा साजरा करण्यासाठी दरवर्षी हजारो वारकऱ्यांची हजेरी अगदी हमखास असते. अंबाजोगाईत आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधीनजीकच विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणाचा उल्लेखही वारकरी धाकटी पंढरी असाच करतात. आषाढीचा सोहळा साजरा करण्यासाठी या ठिकाणीही शहरातील भाविकांची गर्दी असते. आष्टीजवळच्या वाहिला हे गाव तर वारकरी सांप्रदायाची एक आगळीवेगळी मिसालच म्हणायला हवे. शेख महमंद बाबांची समाधी याठिकाणी आहे. या सुफी संताने योगसंग्राम हा ग्रंथ प्राकृतमध्ये लिहिला होता. वाहिला गावात आजही मुस्लीम समाजासहित सर्वजण पंधरवाडी एकादशी करतात. आषाढीचा सोहळा या गावात अगदी भक्तिभावाने साजरा केला जातो.बीड शहरातही विविध विठ्ठल मंदिरात आषाढीचा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. जुन्या मोंढा भागातील विठ्ठल मंदिर हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. बीड शहरातील वारकरी सांप्रदायाची जोपासना करण्यासाठीचे बीजारोपण याच मंदिरातून झाले असल्याचे सांगितले जाते. याठिकाणी असलेली विठ्ठलाची मूर्ती साडेआठशे वर्षापूर्वीची असल्याचे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वरांचे आजोबा श्रीधरपंत ऊर्फ गोविंदपंत कुलकर्णी यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असल्याचे सांगण्यात येते. पांडुरंगबुवा पुजारी यांनी या मंदिराचा पुढे विस्तार केला आणि आज त्यांचीच परंपरा एकनाथ महाराज पुजारी हे चालवीत आहेत. शहरात भगवानगड, कंकालेश्वर, साई प्रतिष्ठानजवळील विठ्ठल मंदिर, अशी काही विठ्ठलाची मंदिरे आहेत. जिल्ह्यात नारायणगड, गोरक्षनाथगड, गहिनीनाथगड, असे आठ गड असून याठिकाणीही आषाढीचा सोहळा उत्साहात साजरा केला जातो.नारायणगडावर दोन लाख 'वैष्णवांचा मेळा'दिनेश गुळवे ल्ल बीडतालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगड मराठवाड्यात ‘धाकटी पंढरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. तब्बल अडीचशे वर्षाची परंपरा असलेल्या या गडावर आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मांदीयाळी आहे. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी गडावर मंगळवारीच अनेक ठिकाणच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. तीर्थ विठ्ठल...क्षेत्र विठ्ठल... म्हणत दूरदूरहून येथे दाखल झालेल्या वैष्णवजनांना आता विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील नारायण महाराज लहानपणापासून देवभक्त होते. त्यांनी तब्बल अडीचशे वर्षापूर्वी बीड तालुक्यातील बालेघाटाच्या कुशीत असलेल्या डोंगरमाथ्यावर नारायणगडाची स्थापना केली. बीड जिल्ह्यासह मराठवाडा व अहमदनगर आदी ठिकाणच्या भावीकांची नारायणगडावर मोठी श्रद्धा असल्याने येथे सातत्याने भाविकांची ‘वारी’ असते. गडावर प्रत्त्येक महिन्याच्या एकादशीलाही वारकरी नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. नारायणगड येथे मंगळवारी रात्रीच अनेक दिंड्यांसह भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीदिवशी तब्बल दोन लाखांपेक्षा ‘वैष्णवांचा मेळा’ येथे भरेल असा अंदाज गडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांनी व्यक्त केला. भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी सुसज्ज दर्शनबारीसह पिण्याचे पाणी व इतर सोय केल्याचेही त्यांनी सांगितले. गडावर मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने येथे परिसरातील अनेक गावचे स्वयंसेवकही असतात. त्याच प्रमाणे ५० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारीही येथे बुधवारी थांबणार असल्याचे शिवाजी महाराजांनी सांगितले. बुधवारी पहाटे ४ पासूनच पूजा झाल्यानंतर दर्शनास सुरुवात होणार आहे. गडावर जाण्यासाठी बीड, गेवराई आगारातून एस. टी. बसही सोडल्या आहेत. भाविकांना गैरसोय होऊ नये, यासाठी स्वयंसेवक विशेष दक्षता घेत असल्याचेही महंत शिवाजी महाराज यांनी सांगितले. देवशयनी एकादशी म्हणजे पर्वणीच !‘देवशयनी एकादशी’ म्हणजे भाविकांसाठी सर्वातमोठी पर्वणीच होय. महाराष्ट्रासह कर्नाटक आदी राज्यातील लाखो भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जातात. आळंदी, देहू, मुक्ताईनगर, पैठण, शेगाव यासह महाराष्ट्रातील हजारो दिंड्या ‘सावळ्या विठुच्या’ दर्शनासाठी पायी जातात. ज्या वारकऱ्यांना पंढरपूर येथे दिंडीत जाता आले नाही, ते धाकटी पंढरी असलेल्या नारायणगड येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येत असल्याचे महंत ह़भ़प़ शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी सांगितले़
तीर्थ विठ्ठल...क्षेत्र विठ्ठल...!
By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST