लासूरगाव : औरंगाबाद जिल्ह्यातील भोई समाजबांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजच्या रोज व्यवसाय करून आपले पोट भरणे हे त्यांचे उपजीविकेचे साधन आहे. परंतु, गेल्या एक वर्षापासून कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. जगायचे तरी कसे, अशी चिंता समाजबांधवांना लागली आहे.
भोई समाजाचा मुख्य व्यवसाय साखरेचे पदार्थ बनवून विकणे असून, महाराष्ट्रातील विविध यात्रांमध्ये जाऊन साखरेचे पदार्थ बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. यात्रांमध्ये रेवड्या, फुटाणे, गोडीशेव, साखरदाणे, मुरमुरे आदी पदार्थ विक्री करून उदरनिर्वाह करतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा यात्रा बंद झाल्या. बाजारपेठा बंद आहेत. सणावारांवर निर्बंध आले. त्यामुळे या समाजबांधवांवर उपासमारीची वेळ आली.
भोई समाज मोठ्या जलाशयांमध्ये मासे पकडून त्याची विक्री करतात. पण, कोरोनामुळे त्या व्यवसायावरही आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातून मार्ग काढत काही समाजबांधवांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पिढीजात आलेला व्यवसाय बंद पडल्यामुळे या पर्यायाकडे त्यांना जावे लागत आहे.
व्यावसायिक म्हणतात...
सध्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आहे. मागील वर्षी देखील यात्रा भरली नाही. यंदाही यात्रा महोत्सवावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. फुटाणे, प्रसाद विक्री बंद झाली आहे. टरबूज, खरबुजाच्या वाड्या यावर्षी पैशाअभावी लावणे शक्य झाले नाही. होळीसाठी गाठी तयार केल्या होत्या. यातून आर्थिक चणचण दूर होईल; पण गाठीचीदेखील विक्री झाली नाही. आता उपजीविका कशी चालणार? याची चिंता लागली आहे.
- चंद्रकांत वाल्डे, लासूरगाव.
महाराष्ट्रातील सर्वच यात्रा बंद असल्या कारणाने आमचा पारंपरिक व्यवसाय बंद पडला आहे. त्यामुळे आम्ही आता रोजच्या रोज भाजीपाला आणून त्याची विक्री करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. परंतु, कोरोनामुळे भविष्यात कसे जगावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- सुनीता वाल्डे, लासूरगाव.