औरंगाबाद : बी.कॉम प्रथम वर्षाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. तथापि, हा निकाल आता चौथ्यांदा असेल. आतापर्यंत या विषयाचा सलग तीनवेळा निकाल बदलण्यात आल्यामुळे विद्यार्थी व पालक हवालदिल झाले होते. चुकीचा निकाल जाहीर करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी परीक्षा विभागाला दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मे महिन्यात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या होत्या. यामध्ये बी.कॉम प्रथम वर्षाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात तब्बल ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. अन्य सर्व विषयांत ‘ए प्लस’ आणि याच विषयात शून्य गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, पालकांनी ही बाब कुलगुरु डॉ. येवले यांच्या लक्षात आणून दिली. कुलगुरुंनी यासंदर्भात प्राचार्य जयसिंगराव देशमुख, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे आणि परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील या तिघांची उपसमिती नेमली. उपसमितीने यासंबंधी सखोल पडताळणी केल्यानंतर असे निदर्शनास आले की, या विषयाचा पेपर मुळातच अतिशय अवघड काढला होता. या पेपरची उत्तरतालिका बरोबर असली तरी विद्यार्थ्यांना तो पेपर अचूक सोडविता आला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी नापास झाले. अशा विद्यार्थ्यांना अन्य विषयांत मिळालेल्या गुणांच्या सरासरी एवढे गुण देऊन या पेपरचा निकाल जाहीर करावा, अशी शिफारस या उपसमितीने विद्यापीठाकडे केली.
मंगळवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत उपसमितीच्या अहवालावर चर्चा झाली व बी.कॉम प्रथम वर्षाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौकट...........
निकाल का व कसा बदलला..
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर झालेल्या या विषयाच्या पहिल्या निकालात ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्येच गडबड झाल्याच्या तक्रारी वाढल्या. वास्तविक कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात ५० गुणांची लेखी (एक्सटर्नल) व ५० गुणांची प्रात्याक्षिक (इंटर्नल) परीक्षा घेतली जाते. इंटर्नल व एक्स्टर्नल या दोन्ही परीक्षांचे निकाल वेगवेगळे जाहीर केले जातात. परंतु परीक्षा विभागातील संगणक परिचालकाने इंटर्नल गुणानुसार या विद्यार्थ्यांचा दुसरा निकाल संकेतस्थळावर अपलोड केला. त्यानंतर ही चूक लक्षात आल्यामुळे पहिल्यांदा जो निकाल जाहीर केला होता तोच निकाल तिसऱ्यावेळी पुन्हा जाहीर केला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, सदरील कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.