परभणी : पोलिस दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल दिले जाणारे अतिशय प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पदक परभणी जिल्ह्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे तब्बल पाच वर्षानंतर परभणी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा या पदकाने सन्मान होत आहे. एकाच वेळी तीन पदक जिल्ह्यातील पोलिसांना प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ असावी.परभणी जिल्ह्यातील राखीव पोलिस निरीक्षक पंडित रघुनाथ राठोड, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ शेषराव मरकंटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मंचक सागरराव बचाटे या तिघांची राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे. पंढरीनाथ रघुनाथराव राठोड यांनी पोलिस दलात मागील ३४ वर्षे सेवा केलेली आहे. उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांनी पोलिस निरीक्षक केंद्र सोलापूर येथे कार्यरत असताना नवीन केंद्राच्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेले कार्य प्रशंसनीय ठरले. त्यांच्या सेवेच्या काळात जालना, उस्मानाबाद, परभणी येथे झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. पंढरीनाथ शेषराव मरकंटे यांनी आपल्या ३६ वर्षाच्या सेवेत उत्कृष्ट कार्य केले. पोलिस दलातून जुलै २०१४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. पोलिस दलामध्ये निष्कलंक सेवा बजावल्याबद्दल मरकंटे यांचा यापूर्वीही गौरव झाला. सुमारे १५० गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. परभणी जिल्ह्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर व पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वरील तिघांचे स्वागत केले आहे.(प्रतिनिधी)बचाटे यांनी केली २०२ आरोपींना अटकशेंडगा येथील रहिवासी असलेले मंचक सागरराव बचाटे हे प्रमाणिक पोलिस कर्मचारी म्हणून ओळखले जातात. वारकरी सांप्रदायाच्या संस्कारात वाढलेल्या बचाटेंचे वडील ह.भ.प.सागरराव बचाटे यांनी आळंदी ते पंढरपूर वारी कधी चुकू दिली नाही. बचाटे यांनी ३५ वर्षे पोलिस दलात कार्य केले. त्यांनी १४६ फरार आरोपींना तसेच वारंटमधील ५६ आरोपींना अटक केली. सोनपेठ, नानलपेठ, डीएसबी, एसीबी, एलसीबी, दैठणा, महामार्ग जिंतूर, वाहतूक शाखा या ठिकाणी कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेतली आहे.
तिघांना राष्ट्रपतीपदक
By admin | Updated: August 15, 2014 00:03 IST