ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद : अवाजवी भाडे मागणे, बंद मीटर, सांगितलेल्या ठिकाणी जाण्यास नकार देणे अशा विविध कारणांनी प्रवाशांना असुविधा देणा-या रिक्षाचालकांची तक्रार करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने तीन महिन्यांपूर्वी एक हजार तक्रार पत्रांचे वाटप केले; परंतु गेल्या तीन महिन्यांत अवघ्या तीनच तक्रारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.
या तीन तक्रारींमध्ये भाडे नाकारणे, हात दाखवूनही रिक्षा न थांबविणे आणि अधिक अंतर फिरवून नियोजित ठिकाणी सोडल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे एका रिक्षाचालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी, एकाचे एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले, तर एका रिक्षाचालकाला समज देण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
प्रवाशांना अनेक रिक्षाचालकांकडून उद्धट वागणुकीला आणि गैरसोयीला सामोरे जावे लागते. परंतु त्यासंदर्भात कोणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न प्रवाशांना भेडसावतो. यावर तोडगा म्हणून आरटीओ कार्यालयाने एक हजार छापील तक्रार पत्रांचे वाटप केले होते. ही पत्रे वाटप करून तीन महिने उलटली; परंतु अवघ्या तीनच तक्रारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.
तक्रार करावी प्रवाशांना केवळ छापील पत्रावरच तक्रार करता येते, असे नाही. अन्य कागदावर तक्रार लिहून, कार्यालयाचा दूरध्वनी आणि ई-मेलवरही तक्रार करता येईल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी सांगितले.