बीड: जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील इमनगाव येथून पैशाच्या कारणावरुन दोघांचे तर शिरुर तालुक्यातील झापेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलीसात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आष्टी व शिरुर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपहरणाच्या घा घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. पोलिसांचा तपास सुरू असला तरी अद्याप या तिघांच्या अपहरणासंदर्भात काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. आष्टी तालुक्यातील इमणगाव परिसरात तलावाचे काम सुरू होते.या परिसरात अमित येवले व निखिल आवटे हे थांबलेले असता त्या ठिकाणी ज्ञानेश्वर प्रकाश वाकुरे व इतर तीनजण चारचाकी वाहनांमध्ये (क्रमांक एमएच-२४ एएच-९९०९ व एमएच-१२ सीके-०५०६) आले व त्यांनी त्या दोघांना मारहाण केली़ वाहन (टिप्पर) क्रमांक एमएच-१४ एलपी-९७२६ सह त्या दोघांना मारहाण करण्याचा धाक दाखवून पळवून घेवून गेले़ दरम्यान, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गंगापूर येथील येवले व उस्मानाबाद जिल्ह्यातील रामवाडी येथील ज्ञानेश्वर वाकुरे यांचा आर्र्थिक व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे़ या प्रकरणी सचिन प्रभाकर येवले यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर प्रकाश वाकुरे व ओम पवार, दिलीप भोसले व सलिम शेख यांनी पैशाच्या कारणावरुन अपहरण केल्या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पो़नि़ डोके करीत आहेत़ शिरुर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील एका १७ वर्षीय मुलीस एका युवकाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले़ बाळु संदिपान सानप असे त्या आरोपीचे नाव आहे़ २ जुन रोेजी ती १७ वर्षीय मुलगी घरातून एका कामा निमित्त बाहेर पडली असता तिला बाळू सानप याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले़ या प्रकरणी त्या मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन सानप याच्याविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ शेळके करीत आहेत़ ती १७ वर्षांची युवती कोणत्या ठिकाणी आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)
आष्टी, शिरूरमधून तिघांचे अपहरण
By admin | Updated: June 7, 2014 00:20 IST