बीड : यंदा अल्प पावसामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट भर हिवाळ्यातच जाणवू लागले आहे. आज स्थितीत आष्टी तालुक्यात वेगवेगळ्या दहा गावांमध्ये टँकर सुरू असून पुढील आठवड्यात दहा टँकर वाढण्याची शक्यता असून, यामध्ये केवळ आष्टी तालुक्यातूनच पाच प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. मागील चार वर्षापासून बीड जिल्ह्यात अल्प पाऊस होत आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने सिंचन प्रकल्प भरलेले नाहीत. परिणामी पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. भर हिवाळ्यात देखील जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दहा ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. यामध्ये कडा, धानोरा, देवळाली आदी गावांचा समावेश आहे. शनिवारपर्यंत याच तालुक्यातील पाच गावांतील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. उन्हाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिन्याचा वेळ आहे. तोपर्यंतच पाणी टंचाईची चाहूल बीड जिल्हावासियांना लागली आहे. परळी तालुक्यातील हिवरा व संगम या दोन गावांना टँकर सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पुढील आठवड्यापर्यंत बीड जिल्ह्यातील टँकरची संख्या दहावरून वीस वर जाण्याची शक्यता आहे. गावाभोवतालचे बोअर व गावातील हातपंपाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली असल्याचे चित्र बीड तालुक्यातील चौसाळा, हिंगणी बु., पालसिंगण, गोलंग्री आदी परिसरात पहावयास मिळत असल्याने प्रशासनाला टँकरने पाणी पुरविण्याची कसरत करावी लागणार आहे. पाण्यासाठी सध्या ठिकठिकाणी महिला, लहान मुले रानोमाळ भटकंती करत आहेत़ (प्रतिनिधी)
जिल्हावासियांची तहान पुन्हा टँकरवरच
By admin | Updated: November 23, 2014 00:25 IST