औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीई सोसायटीसाठी १७० एकर जमीन घेतली; पण ती कुठे व किती हे सोसायटीला माहीत नाही. त्याचे नीट रेकॉर्ड नाही, असे पीई सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. डी. जी. देशकर यांनी रविवारी येथे सांगितले.
मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. सी. घोबले लिखित 'माझा मिलिंदनामा' या पुस्तकाचे प्रकाशन देशकर यांच्या हस्ते झाले. तापडिया नाट्य मंदिरात झालेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश हरिभाऊ साळवे होते.
पीई सोसायटीचे काही सामाजिक उत्तरदायित्व आहे की नाही? असा सवाल करीत देशकर यांनी सांगितले. पीई सोसायटीशी संबंधित काही लोकांना ना विद्यार्थ्यांशी, ना प्राध्यापकांशी, ना प्राचार्यांशी आणि ना समाजाशी काही देणेघेणे आहे. लिटल फ्लॉवर स्कूल ते बेगमपुऱ्याकडे जाणारा रस्ता पीई सोसायटीच्या जमिनीतून जातो. परंतु, या रस्त्यापोटी महापालिकेकडून मिळणारा मोबदलासुद्धा घ्यावा, असे वाटले नाही.
मी ६० वर्षांपासून या सोसायटीशी संबंधित आहे. सध्या माझी भूमिका वाॅच डॉगसारखी आहे. अनेक बैठकांमधून चांगले प्रस्ताव चर्चेसाठी आणले; पण त्याची वाट लावण्यात आली. अनेक प्राचार्यांना सोसायटीचे नियमच माहीत नाहीत. इथे प्रामाणिकपणे काम करणे गुन्हा आहे, असा आरोपही देशकर यांनी केला.
किती व कसा कसा त्रास दिला गेला हे प्राचार्य डॉ. घोबळे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. विधिज्ञ सतीश बोरकर यांनी तर नावे घेऊन टीका केली. बाबासाहेबांची ही संस्था रसातळाला जात असल्याचे पाहून वाईट वाटत असल्याचे नमूद केले. प्रा. सदाशिव डोके यांनी सूत्रसंचालन केले. मंचावर प्रा. मनोहर लोंढे, आदींची उपस्थिती होती. लक्ष्मी ढोबळे हिने पाहुण्यांचे स्वागत केले.