जालना : मुंंबईसाठी जनशताब्दी एक्स्प्रेस सेवा जालना येथून सुरु करण्याबाबत वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची सूचना प्राप्त झाली नसल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड परिमंडळाचे व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, दुपारी त्यांनी जालना स्थानकाची पाहणी करुन विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी काही बदल करण्याच्या सूचनाही रेल्वे प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी मुंबई ते जालना अशी जनशताब्दी सेवा ९ आॅगस्टपासून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली. जालना स्थानकात आवश्यक त्या सोयीसुविधा या एक्स्प्रेससाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगून रेल्वेमंत्र्यांकडे अतिरिक्त वातानुकुलीत डब्याची मागणी केल्याचे दानवे यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रवाशांनी स्थानकावर तिकीट आरक्षणासाठी विचारणा केली असता अद्याप तसे आदेश आले नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर नांदेड परिमंडळाचे व्यवस्थापक पी.सी. शर्मा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी जालना स्थानकाची पाहणी केली. यावेळी सर्व प्लॉटफॉर्मवर काय सुविधा आहेत, याची पाहणी केली. नळ आहेत का, पाणी येते का? याची माहिती घेत सूचना दिल्या. जनशताब्दी ट्रॅक तसेच तेथे लावलेल्या चार्जिंग पॉइंटची पाहणी केली. रेल्वे उपाहारगृहामधील खाद्य पदार्थांचा दर्जा कसा आहे, याबाबत तपासणी केली. रविवारपासून ही सेवा सुरू होणार असेल तर याबाबतचे आदेश स्थानिक रेल्वे प्रशासनास देण्याचे यावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. (प्रतिनिधी)
जनशताब्दी सेवेबाबत अद्याप सूचना नाहीत !
By admin | Updated: August 6, 2015 00:04 IST