जालना : बनावट सीमकार्ड विक्री करणाऱ्या रॅकेटमधील अटकेतील तीन आरोपींना न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी आरोपींची कसून चौकशी सुरू असून बनावट कागदपत्रांच्या आधारे आणखी कुणाला सीमकार्ड दिले का, याचा तपास केला जात असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.जालना शहरात बसस्थानक परिसरात सोनी मोबाईल शॉपी या दुकानावर ५ जानेवारी रोजी छापा मारून दहशतवाद विरोधी पथकाने बनावट सीमकार्डचे रॅकेट उघडकीस आणले. यात सुमित हिरालाल सोनी (वय २९, रा. गायत्रीनगर, जालना), सचिन हिरालाल सोनी (वय २७, रा. गायत्रीनगर, जालना), इम्रानखान अजीजखान (वय २५, रा. मिल्लतनगर, जुना जालना) या तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईत साडेपाच हजार बनावट सीमकार्ड जप्त करण्यात आले. त्यात विविध कंपनीचे सीमकार्ड, १५ पॅनेड्राईव्ह, दोन संगणक, हार्डडिस्क आदी साहित्याचा समावेश होता.अटकेतील आरोपींना मंगळवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या बनावट सीमचा कोठे काही गैरमार्गासाठी वापर झाला की नाही, याची शहानिशा सुरू असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (प्रतिनिधी)
बनावट सीमकार्ड; आरोपींना पोलिस कोठडी
By admin | Updated: January 8, 2015 00:56 IST