बीड : जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या शिक्षक समायोजना दरम्यान शुक्रवारी दुपारी एकच गोंधळ उडाला. जागा लपविल्याचा आरोप करत शिक्षकांनी ही प्रक्रियाच रोखली. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्याचे समायोजन पुढे ढकलावे लागले.शुक्रवारी शिरूर, आष्टी, पाटोदा, वडवणी व अंबाजोगाई या तालुक्यांतील शिक्षकांचे समायोजन होते. अंबाजोगाई तालुक्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर रिक्त जागा किती असा सवाल शिक्षणाधिकारी प्रा. भास्कर देवगुडे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना विचारला. तेंव्हा त्यांनी केवळ सोळा जागा रिक्त असल्याचे सांगितले. तालुक्यात ६० शिक्षक अतिरिक्त आहेत. सोळाहून अधिक जागा रिक्त असल्याचा दावा करत शिक्षक संघटनेच्या संगीता चाटे यांनी आक्षेप घेतला. आधी जागा दाखवा आणि मगच प्रक्रिया सुरू करा, असे म्हणत त्या थेट शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत गेल्या.रिक्त जागांवर सेवा ज्येष्ठतेप्रमाणेच समायोजन झाले पाहिजे, अशी मागणी संगीता चाटे यांनी केली. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. शेवटी प्रक्रियाच गुंडाळावी लागली. यावेळी जि.प. सदस्य बालासाहेब दोडतले, दत्ता जाधव, काँग्रेसचे संजय दौंड, सभापती प्रदीप गंगणे उपस्थित होते. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून समायोजन प्रक्रिया सुरळीत सुरू होती. परंतु गुरुवारी गोंधळ झालाच. (प्रतिनिधी)
शिक्षक समायोजनात गोंधळ; प्रक्रिया रोखली
By admin | Updated: June 28, 2014 01:15 IST