अरूण देशमुख, भूमतालुक्यात पावसाळ्याही ९३ गावांपैकी ३३ गावांसह ११ वाड्यात ३३ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. येत्या १५ दिवसात पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या आणखी वाढवावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे.तालुक्यात गतवर्षीचा झालेला अल्प पाऊस तर यंदा अद्यापही पाऊस नसल्यामुळे विहिरी, बोअर अखेरची घटका मोजत आहेत. यामुळे टंचाईग्रस्त गावांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत वालवड, अंबी, पाथरुड सर्कलमध्ये सर्वाधिक टंचाई जाणवत असून, विहीर, बोअर, तलाव, हातपंपाची पाणीपातळी दिवसागणिक घटत असल्याने टंचाई वाढत आहे. वालवड गावाला पाणीपुरवठा करणारा हिवर्डा तलाव कोरडाठाक असून, या तलावात दर १५ दिवसाला पाण्यासाठी नवीन ठिकाणी खड्डा घेऊन वालवडला पाणी पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुक्यात शहरी भाग वगळता ग्रामीण भागात ९३ गावापैकी ३३ गावे व ११ वाड्या तहानलेल्या असून, टँकरसाठी दिवस-दिवस प्रतीक्षा केली जात आहे. पावसाळा सुरु होवून मृग कोरडा गेला. आर्द्रा सुरु झाल्या तरी पावसाचा पत्ता नसल्याने येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, तालुक्यातील निपाणी येथील ग्रामस्थांनी टंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविला आहे. ‘जीपीआरएस’ नावालाचतालुक्यात खाजगी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील गैरप्रकारास आळा बसावा, यासाठी प्रशासनाने जीपीआरएस ही यंत्रणा बसविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे या टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची आॅनलाईन माहिती तहसील कार्यालयास उपलब्ध होते. तालुक्यातील खाजगी टँकर्सना अशी यंत्रणा बसविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी येथील तहसील कार्यालयात मात्र अशी कुठलीच यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसते. याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांना विचारले असता खाजगी टँकर्सना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, या कामाचे कंत्राट घेतलेल्या संबंधित यंत्रणेने अद्याप ती कार्यान्वित केलेली नसल्याचे सांगितले.तालुक्यात एकूण ९३ गावांपैकी ३३ गावे, ११ वाड्यात पाणीटंचाई असून, एकूण ३३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. यामध्ये ११ शासकीय तर २२ खाजगी टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर ३६ विहीर व २१ बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.सभापतींना साकडेतालुक्यातील इराचीवाडी व बागलवाडी येथील परिसरामधील विहीर, बोअर हे पाण्याअभावी अखरेची घटका मोजत असून, यामुळे या परिसरामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पूर्वी केलेल अधिग्रहण, बोअर, विहिरीची पाणीपातळी घटल्याने आता नव्याने पाण्याचा शोध घेवून अधिग्रहण करण्याची वेळ आली आहे. याच अनुषंगाने इराचीवाडी ग्रामस्थांनी शुक्रवारी पं. स. सभापती अण्णा भोगील यांची भेट घेवून पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे.
३३ गावांसह अकरा वाड्यांना टँकरचा आधार
By admin | Updated: June 28, 2014 01:16 IST