परंडा : अज्ञान पालकाची नोंद कमी करून सातबारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून ५०० रूपयांची लाच घेणाऱ्या सिरसाव सज्जाच्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात जेरबंद केले़ ही कारवाई परंडा शहरातील एका हॉटेलवर शुक्रवारी दुपारी करण्यात आली असून, या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़पोलिसांनी सांगितले की, सिरसाव येथील एका शेतकऱ्याच्या नावावर जवळपास २५ एकर वडिलोपार्जित जमीन आहे़ ते लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावावर जमीन करून अज्ञान पालक म्हणून त्यांच्या आईचे नाव लावले होते़ त्या शेतकऱ्यास गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळणार होते़ त्यामुळे सिरसाव सज्जाचे तलाठी मोहन बसवेश्वर स्वामी यांची भेट घेवून चौकशी केली़ स्वामी यांनी सातबारा नोंदवही पाहून त्याचे नाव अज्ञान म्हणून लावले आहे़ अगोदर अज्ञान पालकाची नोंद कमी करून नंतर सातबारा काढावा लागेल, त्यानंतर अनुदान मिळेल असे सांगिते़ यापूर्वीही संबंधित शेतकऱ्याने अनेकवेळा अज्ञान पालकाची नोंद कमी करण्याची मागणी केली होती़ मात्र त्याचे काम झाले नव्हते़ त्यानंतर तलाठी स्वामी यांच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने अर्ज देवून दोन-तीन दिवस पाठपुरावा केला़ त्या शेतकऱ्याने सिरसाव येथे गुरूवारी सकाळी स्वामी यांची भेट घेत काम करण्याची विनंती केली़ त्यावेळी ‘ते इतकं सोपं नसते, मी तुझा अर्ज मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठवतो, ते अज्ञान पालकाची नोंद कमी करण्यासाठी मंजुरी देतात, मग तसा फेरफार मंजूर झाल्यानंतर फेरची नोंद घेवून मी तुला सातबारा देतो, एवढं काम करण्यासाठी ५०० रूपये द्यावे लागतील, त्याशिवाय काम होणार नाही’ असे सांगितले़ त्यानंतर शेतकऱ्याने उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे रितसर तक्रार केली़ तक्रारीनंतर एसीबीचे अधीक्षक संजय बावीस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक निकलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथील पोलिस उपाधीक्षक अश्विनी भोसले व पथकाने परंडा येथील एका हॉटेलात सापळा रचला़ तलाठी स्वामी यांनी शेतकऱ्याकडून सातबारा नोंद कमी करण्यासाठी ५०० रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारताच कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास उपाधीक्षक भोसले या करीत आहेत़ दरम्यान, लाचप्रकरणी तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़ (वार्ताहर)
लाच घेताना तलाठी चतुर्भुज
By admin | Updated: June 28, 2014 01:16 IST