औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देणारा राज्य मागास वर्ग आयोग बोगस असल्याचे विधान करणारे मंत्री विजय वडट्टीवार यांची हकालपट्टी करा, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरूवारी येथील विभागीय आयुक्तालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
जालना येथे नुकत्याच झालेल्या ओबीसी मेळाव्याला मार्गदर्शन करताना मंत्री विजय वडट्टीवार यांनी समाजात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण देणारा राज्य मागासवर्ग आयोग हा बोगस होता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. वास्तविक राज्य शासनाने कायद्याच्या चौकटीत राहून राज्य मागास आयोगाची स्थापना केली. या आयोगाने राज्यभर फिरून मराठा समाजाच्या दयनीय स्थितीचा अभ्यास करून मराठा समाजाचे मागासलेपण अहवालातून समोर आणले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली. आयोगाचा अहवाल तत्कालिन राज्य सरकारने स्वीकारला आणि मराठा आरक्षण जाहीर केले. घटनात्मक तरतुदीनुसार मराठा समाजाला कायद्याने आरक्षण मिळाले आहे. मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकणार नाही, याकरिता मंत्री वडेट्टीवार हे वेगवेगळे विधान करत असतात. जातीवादी मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने विभागीय आयुक्तालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. या उपोषणात सुरेश वाकडे, किशोर चव्हाण, मनोज गायके, अंकत चव्हाण, सतीश वेताळ, सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे, प्रदीप हारदे, पंढरीनाथ गोडसे, शिवाजी जगताप आदींनी सहभाग घेतला.
=======
फोटो ओळ
विजय वडट्टीवार यांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करण्याची मागणी करीत गुरुवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे विभागीय आयुक्तालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.