औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात झालेला सत्तापालट म्हणजेच समग्र परिवर्तन असे मानणे हा निव्वळ भाबडेपणा आहे. सत्तापालटातून बदल घडवण्याची संधी असली, तरी स्पष्ट विचारशैली, पुरोगामी धोरणे व त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी यातूनच खरा बदल होत असतो, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले. एका व्याख्यानानिमित्त ते शहरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. लोकसभा निवडणुकांचा अन्वयार्थ मांडताना ते म्हणाले, या निवडणुकीचा निकाल हारण्याइतकाच जिंकण्यासाठीही अनपेक्षित होता. भाजपा कमी मते मिळवूनही जास्त जागांवर निवडून आला. मंत्रिमंडळ बनवण्याची प्रक्रियाही कुठल्या मानापमानाविना पार पडली. आता यामागे संघाची शिस्त आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धाक, हे अलाहिदा! गेल्या चार महिन्यांचा सरकारचा कार्यकाळ पाहिला तर एकाही मंत्र्याने धोरणात्मक भाष्य केले आहे, असे दिसत नाही. ती जबाबदारी पंतप्रधान एकटेच निभावत आहेत. त्यांची भाषणे मात्र अगदीच सुभाषितांचा संग्रह वाटतात! पराभवानंतरचा काँग्रेस पक्षही आत्मपरीक्षण न करता निव्वळ राहुल गांधींच्या कौतुकातच मग्न राहिल्याचे ते म्हणाले. सध्याचे राजकीय चित्र पाहता येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये संधीसाधूंच्या घोडेबाजाराची चलती असल्याची भावनाही हर्डीकर यांनी व्यक्त केली.
‘सत्ता पालट म्हणजे समग्र परिवर्तन नव्हे’
By admin | Updated: September 14, 2014 00:21 IST