सितम सोनवणे , लातूरलातूर जिल्हा परिषदेत नुकत्याच काही दिवसांपूर्वी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्तीच्या ४९ कोटी २२ लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. ही मंजुरी देताना सदस्यांसोबत अध्यक्षांशीही चर्चा झाली नसल्याने यावर चर्चा करावी, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या दलित वस्तीच्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या वतीने दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे, मलनि:सारण, वीज, गटारी, बांधकाम, अंतर्गत रस्ते अशी विविध कामे केली जातात. त्यासाठी लातूर जिल्ह्यात ४९ कोटी ५२ लाखांचा निधी शासनाकडून मिळाला होता. या निधीच्या माध्यमातून ६५० गावांतून १५२२ कामांना मंजुरी दिली आहे. ही सर्व मंजुरीची कामे अध्यक्षांच्या गैरहजेरीत झाल्याने निधी वितरणावर चर्चा झाली नाही. कोणाशी चर्चा करून निधी वितरीत केला. आदी बाबींबाबत चर्चा उपस्थित होत असल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी या निधी वितरणावर चर्चा व्हावी, यासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांना पत्र देऊन कळविले आहे. त्यामुळे शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी ४९ कोटींच्या दलित वस्तीच्या कामांना तात्पुरती स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे दलित वस्तीच्या ४९ कोटींच्या कामांना तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. निधी वितरण होऊन १५ ते २० दिवसांचा कालावधी लोटला आहे. याबाबत कोणत्याही सदस्यांचा आक्षेप अथवा तक्रार नसल्याने जिल्हा परिषदेने निधी वितरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. माजी उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक सुरू झाली. सुरुवातीला दलित वस्ती सुधार योजनेच्या ४९ कोटींच्या कामांंना मंजुरी दिल्याने ही प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडल्याने या प्रक्रियेतील सर्व संबंधितांच्या अभिनंदनाचा ठराव जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके मांनी मांडला. याला जि.प. सदस्य भरत गोरे, दिलीप पाटील नागराळकर यांनी अनुमोदन दिले.
दलित वस्तीच्या कामांना स्थगिती !
By admin | Updated: December 20, 2015 23:51 IST