औरंगाबाद : शहरातील हवेचे प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता कृती आराखडा तयार करून १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असे पत्र पर्यावरण मंत्रालयाने मनपा आयुक्त यांना दिले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी देशातील १२२ शहरांमध्ये महत्त्वाकांक्षी व कालबध्द कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने पर्यावरण मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे नियंत्रण केले जात आहे. देशातील १२२ शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारणे हा प्रमुख उद्देश आहे. त्यामध्ये २०२५ पर्यंत हवेतील प्रदूषण ५० टक्क्यांपर्यंत आणणे, २५ टक्क्यांपर्यंत हवेतील गुणवत्ता सुधारणे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उघड्यावर कोळसा, प्लास्टिक, रबर व उर्वरित कचरा जाळण्यास बंदी घालणे, घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षम करणे, घराघरातील कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करणे, प्लास्टिकची विल्हेवाट लावणे, उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, रस्त्यावरील धुळीचे नियोजन करण्यासाठी व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने यांत्रिकीकृत रस्त्याची सफाई, रस्त्यावरील धूळ नष्ट करण्यासाठी स्प्रिंक्लरच्या सहाय्याने पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यातील १८ मनपा व नगरपालिकांची या योजनेकरिता निवड करण्यात आली असून मनपासोबत सामंजस्य करार केला आहे. वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून २०२०-२०२५ या कालावधीसाठी कृती आराखडा तयार करून १५ फेब्रुवारीपर्यंत संचालनालयास सादर करावा, असे पत्र मनपा आयुक्तांना कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे यांनी पाठविले आहे.