औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन ‘पेट’चा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला आहे. या परीक्षेत खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के, तर मागासवर्गीयांसाठी ४५ टक्के गुणांची उत्तीर्ण होण्याची अट असून, पहिल्या पेपरमध्ये ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.
विद्यापीठाने शनिवारी पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) ऑनलाइन घेतली. ४२ विषयांसाठी ११ हजार ७६८ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ११ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ११ हजार १५४ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ६८८ जणांनी मराठीत, तर २८४ संशोधकांनी हिंदी भाषेत ही परीक्षा दिली, तर ५ हजार १८२ विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून पेपर दिला. यातील ११६ जणांना शून्य गुण मिळाले, तर ४ हजार २६३ विद्यार्थ्यांना १ ते ४४.५ टक्क्यांदरम्यान गुण प्राप्त झाले. ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ७७५ एवढी आहे. पहिल्या पेपरला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी ६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली.