कसबे तडवळे : विद्युत तार तुटल्याने ठिणग्या पडून दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना कसबे तडवळे शिवारात बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा तलाठी सुरेश पाटील यांनी पंचनामा केला.कसबे तडवळे येथील शरद दत्तात्रय देशपांडे यांची गोपाळवाडी शिवारात शेती आहे. शेतात दीड एकर ऊस आहे. अडीच महिन्यापूर्वी त्यांचा ऊस कारखान्याला गेला असून, खोडवा जोपासण्यासाठी पाण्याची कमतरता असल्याने ऊसाच्या पाचटाचे सरीत अच्छान केले आहे. बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा चालू झाला असताना मुख्य वीज वाहिनी तुटली. यामुळे शॉटसर्किट होवून ठिणग्या पडल्याने ऊसातील पाचटाने पेट घेतला. यावेळी शेजारी असलेला सुनिल गोपाळ देशपांडे याच्या ध्यानात ही बाब आल्याने त्यांनी तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु, अचानक त्याला तार दिल्याने त्याने आग विझविणे थांबविले. दरम्यान, या सर्व धावपळीत त्याच्या पाय आगीमुळे किरकोळ भाजला. त्यानंतर तेथे आलेल्या प्रत्येकाला त्याने तार तुटल्याचे सांगितल्याने कुणीही आग विझविण्यासाठी गेले नाही. त्यामुळे शरद देशपांडे यांचा दीड एकर, सुनिल गोपाळ देशपांडे यांचा १० गुंठे, पाच पाईप तर सुभाष देशपांडे यांचा १० गुंठे असा एकूण दोन एकर ऊस तारा तुटल्यामुळे जळून खाक झाला. या घटनेचा तलाठी सुरेश पाटील यांनी पंचनामा केला आहे. (वार्ताहर)
ठिणग्या पडून दोन एकरातील ऊस खाक
By admin | Updated: April 30, 2015 00:35 IST