परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात आरोप- प्रत्यारोपांचे बॉम्बगोळे फुटत असताना आता पालकमंत्र्यांकडून बाबूराव पोटभरे तर विरोधी पक्षनेत्यांकडून कालीदास आपेट यांनी हाबूक ठोकला आहे.२६ रोजी संचालकपदाच्या २० जागांसाठी ४० जणांमध्ये सामना होणार आहे. सभा, कॉर्नर बैठका, मेळावे, गाठीभेटी, फेरी यामुळे संपूर्ण तालुका ढवळून निघाला आहे. गुरुवारी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबूराव पोटभरे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलसाठी विविध ठिकाणी सभा, बैठका घेतल्या. त्यांनी सांगितले की, स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना उभा केला. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सभासदांनी खंबीरपणे साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्यास काही लोकांची दृष्ट लागली आहे, अशी कोपरखळी मारत अशा लोकांना खड्यासारखे बाजूला फेका असे आवाहन केले.शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालीदास आपेट यांनी धनंजय मुंडे यांच्या पॅनलच्या प्रचारार्थ सिरसाळा येथे सभा घेतली. ऊसाला एफआरपीनुसार दर दिला नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या पॅनलला पुन्हा विजयी करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एफआरपीला फाटा देणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत त्यांनी धनंजय मुंडे यांना साथ देण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)
परळीत प्रचार शिगेला
By admin | Updated: April 24, 2015 00:39 IST