संतोष धारासूरकर ल्ल जालनासार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत अंदाधूंद कारभाराच्या चौकशीकरिता मंत्रालय स्तरावरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे विशेष पथक बुधवारी जालन्यात दाखल होणार आहे. येथील बांधकाम खात्याच्या दोन्हीही विभागाने गेल्या चार-सहा वर्षांत केलेल्या प्रचंड अनागोंदी कारभाराबाबत ‘लोकमत’ ने मालिकेद्वारे प्रकाशझोत टाकला होता. विशेषत: जालना ते भोकरदन या राज्य मार्गाच्या भयावह अवस्थेबाबत विदारक असे चित्र परखडपणे मांडले होते. त्या राज्य मार्गासह अन्य रस्त्यांच्या डांबरीकरणासह देखभाल, दुरूस्तीच्या नावाखाली केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीची बाब निदर्शनास आणून दिली. काही लेखा शीर्षाखाली मर्यादेपेक्षा दिलेल्या कामांच्या मंजुरीसह वितरीत केलेल्या कोट्यवधी रूपयांच्या देयकांचे किस्से सुद्धा विषद केले होते. राजकीय पुढाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांच्या मर्जीतील मजुर सोसायट्यांना वर्षानुवर्षापासून खिरापतीप्रमाणे वाटलेल्या कामांसह बिलांचा विषय उघडकीस आणला होता. अवघ्या चार वर्षांत देखभाल, दुरूस्तीच्या नावाखाली भोकरदन रस्त्यावरील अवघ्या १० कि़मी. वर केलेल्या ६३ कोटी रुपयांच्या खर्चाची खळबळजनक गोष्ट निदर्शनास आणून दिली. वादग्रस्त तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्यासह वर्षानुवर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या उपअभियंत्यासह एका लिपिकाच्याही दबदब्याचे चित्र मांडले होते. या मालिकेतून तपशीलवार प्रकाशित झालेल्या गोष्टींची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली. पाठोपाठ चौकशीचे आदेश बजावले होते. सकृतदर्शनी चौकशीतून या सर्व गोष्टींना दुजोरा मिळाल्यापाठोपाठ मंत्रालय स्तरावरून नव्याने आयएएस दर्जाच्या नियुक्त झालेल्या बांधकाम खात्याच्या सचिवांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त करीत या पथकास तातडीने चौकशीकरिता जालना गाठण्याचे आदेश मंगळवारी बजावले आहेत. त्याप्रमाणे हे पथक बुधवारी जालन्यात दाखल होणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत अनागोंदी कारभाराच्या चौकशीकरिता पहिल्यांदाच मंत्रालय स्तरावरून ते सुद्धा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे विशेष पथक गठीत होण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळेच बांधकाम खात्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ४येथील जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना मंत्रालयातून मंगळवारी दुरध्वनीद्वारे या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकास सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना बजावण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.गेल्या काही वर्षात दोन्ही विभागाने केलेल्या अंदाधुंद कारभाराचे अंदाजपत्रके, देयके, जॉब नंबर रजिस्टर, लेझर बुक, अकाऊंट बुक्स, एम.बी. वगैरे कागदपत्रे उच्चदपदस्थ समितीद्वारे ताब्यात घेतले जातील, अशी दाट शक्यता असून त्यामुळेच तत्कालीन व विद्यमान स्थानिक अभियंत्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईची शक्यता४काही वर्षांत केलेल्या कामांच्या संदर्भातील कागदपत्रे वादग्रस्त अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी गहाळ केली असल्यास उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे हे पथक संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
चौकशीसाठी विशेष पथक दाखल होणार
By admin | Updated: January 7, 2015 00:59 IST