जालना : उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दाखल झालेल्या १६ जणांच्या पथकाने बांधकाम खात्याच्या दोन्ही विभागातील कागदपत्रांची छाननी सुरु केली आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दोन्ही विभागांतर्गत विविध लेखाशिर्षाखाली केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी बांधकाम खात्याच्या सचिवांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विशेष पथक जालन्यात दाखल झाले आहे. या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या पथकातील काही सदस्यांनी विभाग क्रमांक १ व विभाग क्रमांक २ या कार्यालयांना दुपारी १२ च्या सुमारास भेटी दिल्या. सुमारे सव्वा तास दोन उच्च पदस्थ अधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. स्थानिक अभियंत्यांबरोबर बंद खोलीत चर्चा केल्यानंतर हे अधिकारी तेथून बाहेर पडले. अन्य स्थळी रवाना झाले. तत्पूर्वी या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण काही बोलणार नाही, असे या अधिकाऱ्यांनी नमूद केले. पथकातील काही सदस्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत कार्यालयात ठाण मांडून कागदपत्रांची छाननी करीत माहिती अवगत केली. जिल्हास्थानच्या सा.बां. च्या या दोन विभाग कार्यालयासह अन्य उपविभागातील कार्यालयामधून सुध्दा पथकाच्या काही सदस्यांनी भेटी देवून कागदपत्रांची छाननी केल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)४मंत्रालयातून दिलेल्या आदेशाप्रमाणे दोघा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह १६ जणांचे हे पथक दाखल झाले असून या पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी स्वत:ची नावे किंवा पदे सांगावयास नकार दिला. सरकारी सूत्रांनी सुध्दा पथकाच्या या दौऱ्यासंदर्भात गोपनीयता बाळगण्याचा आदेश असल्याने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.४दोन्ही विभागांतर्गत एकूणएक कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच येथील गैरप्रकारांसह अनियमिततेबाबत तात्काळ बांधकाम खात्याच्या सचिवांना अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील १६ जणांच्या या पथकाने कागदपत्रांची छाननी केल्यानंतर व आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतल्याच्या कारवाईनंतर तांत्रिक पथके दाखल होणार आहेत. या पथकाद्वारे प्राप्त कागदपत्रांच्या आधारे मंजूर कामे, एकूण देयके वगैरे बाबींवर तपासणी केल्यानंतर प्रत्यक्ष साईडस्ची तपासणी केली जाणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. काही कागदपत्रे ताब्यात४बांधकाम विभागाच्या दोन्ही विभागातील कागदपत्रांची या पथकाने पाहणी केल्यानंतर त्यातील काही आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. विशेषत: गहाळ असणाऱ्या कागदपत्रांचीही पथकाद्वारे नोंद केली जाणार आहे. जे रेकॉर्ड उपलब्ध आहे, त्याप्रमाणेच भविष्यात सुध्दा व्यवहार होतील, गहाळ कागदपत्रांसह बिलांबाबत कोणताही भविष्यात व्यवहार होणार नसल्याची धक्कदायक माहिती हाती आली असून त्यामुळे विविध कामांसंदर्भात मूळ कागदपत्रे गहाळ केलेल्या कामांची देयके मिळणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.काम वाटपाबाबतचे रजिस्टर, कामांची संख्या, केलेल्या कामांची संख्या, सादर केलेल्या बिलांची संख्या वगैरे गोष्टींचा गेल्या काही वर्षात ताळमेळच बसत नसल्याचे धक्कादायक वृत्त असून प्रशासकीय स्तरावरील ही अनियमीतता या पथकाने गांभीर्याने घेतली असल्याची माहिती हाती आली आहे.
विशेष पथकाने सुरू केली कागदपत्रांची छाननी
By admin | Updated: January 8, 2015 00:57 IST