जालना : येथील जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्यांचा बंगला बेकायदेशीररित्या हडप केल्याप्रकरणी सोसायटीचे पी.पी. मराडी व इतरांविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सुरेश डावखरे करीत आहेत. ही माहिती जमादार गणेश सोळंके यांनी दिली. याप्रकरणी २००७ मध्ये करण्यात आलेल्या तक्रारीत सदर प्रकार नमूद करण्यात आला होता. हे माहीत असूनही सोसायटीच्या मंडळीने जाणीवपूर्वक सदर जागेसंदर्भात मालकी हक्क बदलण्याचा निर्णय घेतला. यात चॅरिटी कमीशनर यांची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यासाठी सदर मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जेम्स अंबिलढगे यांनी केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयात खाजगी खटला दाखल करून फौजदारी प्रक्रीया संहिता १५६ (३) नुसार कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यावर सुनावणी होऊन पी.पी. मराडी, व्ही.जे. सिरवैय्या, प्रेम रहमत मसी, ख्रिस्तोफर मोजस, प्राचार्य बेनहर बार्नबस साळवे तथा सिटीसर्व्हे आॅफीसर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आदेश न्यायालयाने दिले आहेत. सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)
जागा बळकावली; पोलिसांत गुन्हा दाखल
By admin | Updated: December 22, 2014 00:57 IST