बोरी : परिसरात पंधरा दिवसांपूर्वी अल्पश: पावसावर केलेली खरिपाची पेरणी वाया गेली आहे. ५ आॅगस्ट रोजी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीस प्रारंभ केला आहे. यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी संकटाचेच म्हणावे लागेल. कारण मे महिन्यात बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती. त्यानंतर जून महिन्यात पावसाने हजेरी न लावल्याने ही कपाशीची पिके उन्हामुळे जळून गेली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कपाशी मोडून सोयाबीन, तूर या पिकांची लागवड करावी लागली. जून व जुलैचा महिना कोरडा गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बोरी व परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन व तूर या पिकांची पेरणी केली. अल्पश: पावसावर पेरणी केल्यामुळे बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी दुबार सोयाबीन पिकाची लागवड करण्यास प्रारंभ केला आहे. बोरी व परिसरातील हजारो हेक्टर जमीन पडीक राहिली आहे. (वार्ताहर)
पावसाच्या आगमनाने दुबार पेरणी
By admin | Updated: August 7, 2014 01:26 IST