औरंगाबाद : स्वप्ने का पडतात, आकाशाचा रंग निळा का असतो, मानवाला मृत्यू का येतो, आपण अदृश्य होऊ शकतो काय, असे प्रश्न ‘त्याला’ लहानपणापासूनच भेडसावत होते. निर्माण झालेल्या या प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून ‘थेअरी व्हर्सेस थेअरीज’ या इंग्रजी पुस्तकाचा आविष्कार त्याने वयाच्या १५ व्या वर्षी घडविला. विशेष म्हणजे पुस्तकाचे जागतिक स्तरावर प्रकाशन झाले असून, विविध संकेतस्थळांवर ते उपलब्ध आहे. सनी ज्ञानेश्वर धोंडकर, असे या किशोरवयीन लेखकाचे नाव असून, तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. असाधारण प्रश्न मनात निर्माण होणे, हा मानवाच्या स्वभावाचा स्थायिभावच आहे. फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसच का असतात, अपायकारक पदार्थ चविष्ट का असतात, मानवाला मृत्यू का येतो, कॅन्सरवर मात करता येते का, मेंदू तल्लखपणे कार्य करताना नेमके काय घडते, ब्रह्मांडामध्ये नेमके काय चालते, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सनी धोंडकरला मात्र हे प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातूनच अखेर ‘थेअरी व्हर्सेस थेअरीज’चा आविष्कार झाला.असा घडला लेखकअपायकारक पदार्थ आपल्याला का आवडतात’ या विषयावर सनीने एकेदिवशी लेख लिहिला. शिक्षकांबरोबरच आई दीपमाला यांनादेखील हा लेख आवडला. सनीची लेखन क्षमता जेव्हा गुरुजन, पालकांना समजली तेव्हा त्यांनी लिखाणासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर तीन महिन्यांत त्याने ‘थेअरी व्हर्सेस थेअरीज’ हे पुस्तक लिहून काढले. आॅनलाईन वाचन शक्यसनी धोंडकर याचे पुस्तक फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, इन्फ्लीबिम, अशा संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. ई- बुक, अॅमेझॉन किंडल आणि गुगल प्ले, यावर ते वाचण्यास मिळते. ‘गुड रिड्स डॉट कॉम’ वर या पुस्तकाचे वर्णन उपलब्ध आहे. फेसबुकवरही पुस्तकाचे वाचन करता येणे शक्य आहे.
मनातील प्रश्नांची ‘थेअरी व्हर्सेस थेअरीज’ मधून उकल
By admin | Updated: July 26, 2016 00:20 IST