कळंब : जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ असलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यवहार हमाल मापाडी व व्यापारी संघटनातील वादंगामुळे मागील अकरा दिवसापासून ठप्प झाले होते. यासंदर्भात गुरूवारी व्यवस्थापनाने बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मात्र आंदोलन मागे घेण्याचा निर्णय हमाल मापाडी संघटनेने घेतल्यामुळे शुक्रवारपासून हे व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील अग्रगण्य कृषी बाजारपेठ म्हणून कळंब बाजार समितीकडे पाहिले जाते. विस्तीर्ण जागेत स्थिरावलेल्या या बाजार समिती आवारात दररोज शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतात. बाजार समितीमधील नोंदणीकृत आडते, हमाल मापाडी यांची संख्याही मोठी आहे. लगतच्या केज तालुक्यासह कळंब तालुक्यातून मोठा शेतमाल याठिकाणी विक्रीसाठी येतो. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी अस्तित्त्वात आलेली ही बाजार समिती अलिकडे विविध कारणाने चर्चेत राहत आहे. मापटे पद्धत, आकारली जाणारी आडत, कडता यासह हमाल मापाडी व व्यापारी यांच्यातील विसंवाद यामुळेही बाजारातील व्यवहारावर परिणाम झाल्याचे दिसून येते. हमाल मापाडी, व्यापारी यांच्या संघटना असल्या तरी शेतमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र संघटन नसल्याने अनेकदा बाजार समिती आवारातील आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीच्या संचालक मंडळात १८ पैकी अकरा सदस्य शेतकरी प्रवर्गातील असतानाही कोंडीच्या वेळी शेतकऱ्यांचा विचार होताना दिसत नाही. मागील काही दिवसांपासून या बाजार समिततील आडते आणि हमाल संघटनेत वांदग निर्माण झाल्याने हमाल संघटनेने शेतकऱ्यांचा कैवार घेऊन २३ मार्चपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. यामध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून घेत असलेली तीन टक्के आडत कमी करुन ती दोन टक्के करावी, व्यापारी घेत असलेला कडता बंद करावा अशी मागणी हमाल संघटनेने केली होती. असे असले तरी या वांदगामागे ‘मापटं’ बंद होणे आणि त्या बदल्यात देण्यात येणाऱ्या वाढीव हमालीचा विषय असल्याची चर्चा बाजार समिती आवारात रंगली होती. यामुळेच व्यापारी व हमाल यांच्यात नवा संघर्ष सुरू झाला होता. अखेर गुरूवारी झालेल्या बैठकीनंतर यावर तोडगा काढून हा वाद मिटविण्यात आला. (वार्ताहर)
हमाल-व्यापाऱ्यांतील वादावर अखेर पडदा
By admin | Updated: April 8, 2016 00:22 IST