जालना : शिक्षकांचे पगार दरमहा एक तारखेला करण्याची घोषणा राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी केली होती. मात्र ही घोषणा हवेतच असून जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील सहा हजार शिक्षकांचे पगार अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्हा परिषदेची सर्वात मोठी यंत्रणा म्हणून शिक्षण विभाग समजला जातो. या विभागाअंतर्गत सहा हजार शिक्षक कार्यरत आहेत. परंतु या शिक्षकांचे पगार दरमहा विलंबाने होत असल्याने त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. जानेवारी महिन्याचे शिक्षकांचे अनुदान शिक्षण संचालकांकडून १० फेबु्रवारी रोजी प्राप्त झाले. त्यानंतर पुढील प्रक्रियेमध्ये नऊ दिवस गेले, मात्र अद्याप शिक्षकांचे पगार अदा करण्यात आलेले नाहीत. विविध शिक्षक संघटनांनी पगार नियमित होण्यासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी निवेदने सादर केलेली आहेत. राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने शिक्षकांचे पगार एक तारखेला देण्याची घोषणा केली. परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अजहर पठाण, सरचिटणीस शांतीलाल गोरे, उत्तम वायाळ, भगवान भालके, प्रकाश शहाणे, के.जी. राठोड, अण्णा इंगळे, विजय चित्ते आदींनी पगार विलंबाने होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब जुंबड, मधुकरराव शेळके, रमेश हुशे, दिनकर पालवे, नंदकिशोर टोके, राजेंद्र कायंदे, किरण देशमुख, शिवाजी बांदल, विष्णू सपकाळ, शिवाजी डाके आदींनीही नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)याबाबत प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, शिक्षण संचालकांकडून शिक्षकांच्या वेतन अनुदानाची रक्कम १० फेबु्रवारी रोजी प्राप्त झाली. त्यामुळे शिक्षकांचे पगार विलंबाने होत आहेत.
जि.प.चे सहा हजार शिक्षक पगाराविना
By admin | Updated: February 20, 2015 00:06 IST