औरंगाबाद : गेली आठ दशके मराठी मनात घर केलेले श्यामची आई आता बोलक्या रूपात रसिकांसमोर येत आहे. माहितीपट निर्माते व दिग्दर्शक राजेंद्र जोशी यांनी हा प्रयोग साकारला असून, हे आॅडिओ बुक गुढीपाडव्याच्या सुमारास रसिकांना उपलब्ध होईल. पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींनी आपल्या रसाळ वाणी आणि लेखणीतून अजरामर केलेली साहित्यकृती म्हणजे श्यामची आई. नाशिकच्या कारागृहात असताना साने गुरुजींनी १९३३ साली केवळ पाच रात्रीत या पुस्तकातील बेचाळीस प्रकरणे लिहून संपवली. बालपणी अबोधपणे अनुभवलेली आईची रूपे मांडत मनावर सहज संस्कार करणारे हे लिखाण आहे. पहिल्यांदा १९३५ साली अंमळनेरच्या जगन्नाथ गोखले यांनी हे पुस्तक प्रकाशित केले. साने गुरुजी यांच्या निधनानंतर साठ वर्षांनी, म्हणजे २०१० साली हे पुस्तक नियमानुसार स्वामित्वहक्कातून मुक्त झाले. त्यानंतर अनेक प्रकाशकांनी त्याला नव्या रूपात प्रकाशित केले. याच पुस्तकावर आधारित आचार्य अत्र्यांनी दिग्दर्शित केलेला ‘श्यामची आई’ हा चित्रपटही १९५३ साली झळकला; मात्र आधुनिक तंत्रयुगात ही साहित्यकृती केवळ मुद्रित व चित्रमाध्यमापुरती मर्यादित न राहता आॅडिओ बुकसारख्या माध्यमांतूनही पोचली पाहिजे या कल्पनेतून हा प्रयोग केल्याचे जोशी सांगतात. त्यांनी आजवर चारशेहून अधिक माहितीपट बनवले आहेत. ते म्हणाले, ‘वेगवान जीवनशैलीच्या गरजा ओळखून प्रवासातही ऐकता येईल, असे आॅडिओ बुक्स अर्थात बोलकी पुस्तके आता विदेशासह भारतातही लोकप्रिय होत आहेत. बालपणी आजीकडून ऐकलेल्या गोष्टींसारखीच निवेदनशैली यात वापरली आहे. श्रुतिका वा नभोनाट्यासारख्या अनेक पात्रांच्या आवाजात अभिवाचन न करता एकच निवेदक वापरत कथाकथनाचे रूप याला दिले आहे. माध्यमांतर करताना मजकुरावर काही संस्कार करणे आवश्यक होते; मात्र मूळ कथानकाला आम्ही धक्का लागू दिला नाही.’ काही महिन्यांपूर्वी लेखक-प्रकाशक बाबा भांड यांच्या ‘धर्मा’ कादंबरीचे आॅडिओ बुक केले असता भांड यांनीच ‘श्यामची आई’ आॅडिओ रूपात आणण्याची कल्पना सुचवल्याचेही जोशी म्हणाले. प्रकाशनानंतर पुस्तक वितरकांमार्फत राज्यभरातील शाळांमध्ये हे आॅडिओ बुक पोहोचवले जाणार आहे.
‘श्यामची आई’ आता श्राव्य माध्यमातून !
By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST